ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव देण्याची परंपरा जपली !

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिपावली सणानिमित्त कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे अनुदान, असा २९.६२ टक्के बोनस देणार असल्याची घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ या गळीत हंगामाच्या पहिल्या साखर पोत्याचे काल रविवारी आमदार थोरात यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, व्हा. चेअरमन संतोष हासे, अॅड. माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सचिव किरण कानवडे, विश्वास मुर्तडक आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार थोरात पुढे म्हणाले, थोरात साखर कारखान्याच्या वतीने नेहमीच सभासद व कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करण्यात आला आहे. कारखान्याने यावर्षी २८३५ रुपये उच्चांकी भाव दिला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गळीत हंगामाचा शुभारंभ अत्यंत साध्या पद्धतीने झाला. या कार्यक्रमास आपण उपस्थित राहू शकलो नाही.

‘साखर कारखान्याने गळीत हंगामाची जोरदार तयारी केली आहे. यंदा दहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण केले जाईल. थोरात कारखान्याने मार्चमध्ये साखरेचा साठा करून ठेवला होता. यानंतर साखरेला चांगला भाव मिळाल्याने त्याचा फायदा निश्चितपणे झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आपल्या भाषणात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या कडव्या शिस्तीमुळे साखर कारखाना पहिल्यापासून प्रगतीपथावर आहे.या कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव देण्याची परंपरा जपली आहे.

कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. तर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe