मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा..!! बाजारभावाच्या आशेवर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गावरान कांद्याची लागवड

Ahmednagarlive24 office
Published:

Onion News : कांदा उत्पदकांचे मागील काही दिवसांपासून काय हाल सुरु आहेत हे सर्वश्रुत आहेत. अगदी साधा खर्चही निघेना, बाजारात कांदा आणला तर पदर भाडे भरावे लागले अशी स्थिती झाली होती. निर्यातबंदीनंतर तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह मजूरही कोलमडून पडले होते.

परंतु असे असले तरी शेतकरी हा शेतकरीच असतो. कसलाही विचार न करता भविष्यात बाजार भेटेल या आशेवर पुन्हा एकदा नव्या जिद्दीने उभा राहत मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरु केलीये. मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा.. या कवितेच्या ओळी सार्थ ठरवत पुन्हा जोमाने उभा राहतोय.

खते-औषधे-बियाणे महाग झाल्याने शेती कशी करावी असा प्रश्न उभा असून कांदा काढणीनंतर भाव चांगला मिळाला नाही तर मोठे नुकसान होईल हे देखील निश्चित. मात्र तरीही यंदा गावरान कांद्याची लागवड सुरू केली असून कांदा पिकवणे आमच्या हातात आहे, बाजारभाव नाही, अशी खंत देखील शेतकरी व्यक्त करत आहेत.

सध्या श्रीगोंदे, शेवगाव, पाथर्डी आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावरान कांद्याची लागवड सुरू झाल्याचे चित्र आहे. यंदा शेतकऱ्यांनी लाल कांद्याची कमी लागवड केली असून, गावरान कांदा टिकवता येतो म्हणून या लागवडीकडे कल वाढला आहे. सध्या कांदा रोपांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

श्रीगोंदे तालुक्याचा विचार केला तर भांडवलाअभावी तसेच पर्जन्यमान कमी झाल्याने बागायती पिकांची लागवड कमी झाली असून कुकडी व घोड कालवा, तसेच भीमा नदीपट्ट्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी गावरान कांदा लागवडीकडे जास्त लक्ष दिले आहे.

कांदा लागवडीसाठी एकरी १० ते १२ हजार रुपये मजुरी

शेत जमिनीची मशागत, जमीन कांदालागवड योग्य होण्यासाठी फिरवावा लागणारा रोटर, वाफे तयार करण्यासाठी ट्रॅक्टर किंवा बैलाच्या यंत्राचा उपयोग आदी गोष्टी कराव्या लागतात. त्यानंतर वाफे माती लावून योग्य करण्यासाठी एकरी ७ ते ८ हजार रुपये मजुरांना द्यावे लागतात. शेतकऱ्यांना कांदा लागवडीसाठी एकरी १० ते १२ हजार रुपये मजुरी द्यावी लागत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe