राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या खरबुजाची दैनंदिन आवक १५ ते १८ टनांवर पोहोचली आहे, परंतु या वाढत्या आवकेमुळे खरबुजाच्या बाजारभावात लक्षणीय घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी ३० रुपये किलो असलेला भाव रविवार, २३ मार्च २०२५ रोजी १० ते १५ रुपये किलोपर्यंत खाली आला.
यामुळे शेतकऱ्यांना खरबूज लागवडीवर झालेला खर्च वसूल करणे अवघड झाले आहे. उन्हाळ्यात थंडावा देणारे फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खरबुजाची लागवड जानेवारीत झाली होती आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून काढणी सुरू झाली.

राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण, वळण, मांजरी, वांबोरी, मानोरी, टाकळीमिया तसेच नारायणगाव या भागातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी राहुरी बाजार समितीत आणत आहेत.
रमजान महिना डोळ्यासमोर ठेवून अनेक शेतकऱ्यांनी खरबुजाची लागवड केली होती, परंतु मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने भावावर नकारात्मक परिणाम झाला आहे. बाजारात कुंदन खरबुजाला विशेष मागणी असली, तरी रॉयल आणि विजय या जातींचे खरबूजही विक्रीसाठी दाखल होत आहेत.
मागील आठवड्यात चांगल्या प्रतीच्या खरबुजाला ३० रुपये किलोचा भाव मिळाला होता, पण आता १० ते १५ रुपये किलोवर लिलाव होत आहेत. शेतकरी राधेश्याम अप्पासाहेब खिलारी (वळण) यांनी सांगितले की, खरबूज लागवडीपासून ते बाजारात येईपर्यंत एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो.
एकरी १२ ते १४ टन उत्पादन मिळते आणि ९,००० रोपांची लागवड होते. यात काढणी आणि वाहतुकीचा खर्चही मोठा आहे. त्यामुळे खरबुजाला किमान ४० ते ५० रुपये किलो भाव मिळणे अपेक्षित आहे, परंतु सध्याचा मातीमोल भाव शेतकऱ्यांना तोट्यात टाकणारा आहे.
राहुरी बाजार समितीतील व्यापारी दीपक रकटे यांनी सांगितले की, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खरबुजाची आवक वाढली आहे, ज्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. रमजान महिन्यात खरबुजाचा उठाव कमी झाला असून,
मागणीपेक्षा उत्पादन जास्त असल्याने भाव १० ते १५ रुपये किलोवर स्थिरावले आहेत. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, खर्च वसुलीची चिंता वाढली आहे.