अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांवर काद्यांमुळे रडण्याची वेळ, बाजारभाव नसल्यामुळे शेतीतील खर्चही निघेना

नगर तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी बाजारभाव गडगडल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कडाक्याच्या उन्हात कांदा काढणी सुरू असून, ७०-८० हजार रुपयांचा खर्च करूनही उत्पादन कमी व बाजारभाव तुटपुंजा असल्याने शेतकरी संकटात आहेत.

Published on -

अहिल्यानगर- कडाक्याच्या उन्हात शेतात कांदा काढणीचं काम जोरात सुरू आहे. मजूर आणि शेतकरी रात्रंदिवस राबताहेत, पण बाजारात कांद्याचे भाव इतके घसरलेत की, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडतेय. कांदा लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. ज्या कांद्यावर वर्षभराच्या खर्चाची गणितं बांधली होती, त्याच कांद्याने आता शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय.

कांदा उत्पादनात अग्रेसर

अहिल्यानगर तालुका हा कांदा उत्पादनाचा मोठा केंद्रबिंदू आहे. वीस वर्षांपूर्वी इथलं ज्वारीचं पठार प्रसिद्ध होतं, पण गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांनी जिरायती जमिनीवरही सिंचनाची सोय करून कांदा लागवडीला प्राधान्य दिलं. लाल, रांगडा आणि गावरान कांद्याचं इथं विक्रमी उत्पादन होतं.

पण यंदा वातावरणाच्या लहरीपणाने आणि बाजारभावाच्या चढ-उताराने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. रब्बी हंगामात तालुक्यात सुमारे २० हजार हेक्टरवर गावरान कांद्याची लागवड झाली. आता कुठे कांदा काढणीला आलाय, तर कुठे काढणी पूर्णही झाली. पण बाजारात भाव पाहून शेतकऱ्यांचा हिरमोड झालाय.

उत्पादनात घट

लाल कांद्याला काही ठिकाणी पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला, तेव्हा शेतकऱ्यांना थोडं समाधान वाटलं. पण वातावरणाच्या बदलामुळे लाल कांद्याचं उत्पादनच इतकं कमी झालं, की चांगला भाव मिळूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलं नाही. जेऊर, सयेवाडी, बहिरवाडी, इमामपूर ही कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध गावं आहेत. इथल्या जमिनी कांदा लागवडीसाठी उत्तम आहेत, पण यंदा पाण्याची कमतरता आणि टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आल्याने उत्पादनात मोठी घट झाली.

लागवडीचा खर्चही निघेना

वाळकी, अकोळनेर, यास, देहरे, रुईछत्तीसी, चिचोंडी पाटील या भागात गावरान कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. पण आता कांदा बाजारात आला आणि भाव पाहून शेतकऱ्यांचा जीव गलबललाय. सध्या कांद्याला फक्त ८०० ते १३०० रुपये क्विंटल भाव मिळतोय. “या भावात तर लागवडीचा खर्चही निघणार नाही,” असं जेऊरमधील शेतकरी माणिकराव बनकर सांगतात. त्यांनी एक एकरवर गावरान कांदा लावला, ज्यासाठी मशागत, बियाणं, खुरपणी, खत, औषधं आणि काढणी यासाठी ७० ते ८० हजार रुपये खर्च केले. पण बाजारभाव पाहता हा खर्चही परत मिळेल की नाही, याची शाश्वती नाही.

भाववाढीची खात्री नाही

उन्हाचा पारा चढलाय, पण संसाराचा गाडा चालवण्यासाठी शेतमजूर आणि महिला कडक उन्हातही कांदा काढताहेत. “पाणीटंचाईमुळे शेती आणि दुग्धव्यवसाय दोन्ही अडचणीत आलेय. उत्पन्न हाती नाही, त्यामुळे मजुरीशिवाय पर्याय नाही. पण या उन्हात काम करताना जीव नकोसा होतो,” असं शेतमजूर छाया तोडमल सांगते. कांदा वखारीत साठवला, तरी भविष्यात भाव वाढतील याची खात्री नाही. शिवाय, साठवणुकीत कांदा खराब होण्याची आणि वजन कमी होण्याची भीतीही आहे. त्यामुळे शेतकरी पुरता द्विधा मनःस्थितीत आहे.

शेतकऱ्यांची मागणी

“कांदा हा आमचा आधार आहे, पण यंदा तोच आम्हाला रडवतोय,” असं सयेवाडीतील एक शेतकरी म्हणाला. पाण्याची टंचाई, वातावरणाचा फटका आणि घसरलेले बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. आता सरकारने कांद्याला योग्य भाव मिळवून द्यावेत, अशी मागणी शेतकरी करताहेत. नाहीतर, यंदाही कांदा उत्पादकांचं नुकसान अटळ आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe