राज्य मार्ग ६५ रस्त्यासाठी अडीच कोटी निधी मंजूर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातून जात असलेल्या राज्य मार्ग ६५ वरील कोपरगाव–पढेगाव रस्त्याच्या नूतनीकरणासाठी अडीच कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातून राज्यमार्ग ६५ जात आहे. कोपरगावहून वैजापूरला जाण्यासाठी या मार्गाचा कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना उपयोग होत असतो. मात्र मागील काही वर्षापासून कोपरगाव ते पढेगाव या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती.

त्यामुळे पढेगाव, कासली, शिंगणापूर, उक्कडगाव आदी गावातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. त्याबाबत नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत मागणी केली होती.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील अनेक रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट होती.

अशा अनेक रस्त्यांच्या नुतनीकरणासाठी निधी मिळावा याबाबत आमदार आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु होता त्या पाठपुराव्यातून मतदार संघातील अनेक रस्त्यांसाठी निधी मिळाला असून अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत.

तसेच ज्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे अशा रस्त्यांच्या कामांसाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव शासनदरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्या प्रस्तावांना देखील लवकरच मंजुरी मिळून या रस्त्यांचे काम मार्गी लागणार आहे.

कोपरगाव-पढेगाव रस्त्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून या रस्त्यासाठी अडीच कोटी मंजूर करण्यात आले आहे.

या निधीतून या रस्त्याचे मातीभराव, खडीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण, तसेच मुरूम बाजूपट्टी, कच्चे गटर्स, नवीन पाईप मोरीचे बांधकाम करणे आदी कामे केली जाणार आहे.

मागील काही वर्षापासूनचा या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून या मार्गाने नियमित ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe