२ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : २०२४ हे भारतासाठी १९०१ सालापासूनचे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. गतवर्षात सरासरी किमान तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा ०.९० अंश सेल्सिअस अधिक होते.यापूर्वी २०१६ हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष होते.
भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी बुधवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार २०२४ वर्षात संपूर्ण भारतात वार्षिक सरासरी भू पृष्ठभाग वायू तापमान हे दीर्घकालीन सरासरीच्या ०.६५ अंश सेल्सिअस अधिक होते. १९९१ ते २०२० या कालावधीतील तापमानावर दीर्घकालीन सरासरी काढली जाते.
युरोपियन हवामान संस्था कोपनिकसने देखील २०२४ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष असेल, असा अंदाज वर्तवला होता. गतवर्षात जागतिक सरासरी तापमान औद्योगिकीकरणाच्या आधीच्या पातळीपेक्षा दीड अंश सेल्सिअसने अधिक नोंदवण्यात आले आहे. हवामान खात्याने चालू वर्षासाठीदेखील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.
त्यानुसार जानेवारीत देशातील पूर्व, वायव्य आणि पश्चिम- मध्य प्रदेश वगळता बहुतांशी भागात सामान्यपेक्षा अधिक तापमान राहील. मध्य भारताच्या पश्चिम आणि उत्तर भागात नेहमीपेक्षा अधिक थंडी असेल. हवामान खात्याने जानेवारी ते मार्च या कालावधीत उत्तर भारतात पावसाचादेखील अंदाज वर्तवला आहे. पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात रबी पिकांचा हंगाम आहे. अवकाळी पावसाचा या पिकांना फटका बसू शकतो.