अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे, यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून लालपरीची चाके थांबलेली आहे. काही ठिकाणचा अपवाद वगळता अद्यापही राज्यात अनेक ठिकाणी संप सुरूच आहे. दरम्यान यामुळे एसटी प्रशासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आतापर्यंत ५७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेतले जाईल. या कर्मचाऱ्यांनी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केल्या आहेत, याबाबत चौकशी करण्यात येत असून ती पूर्ण झाल्यावर वारसांना नोकरीत सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही देतानाच, संपामुळे महामंडळाचे ६५० कोटींचे नुकसान झाले असून २५ हजार कर्मचारी कामावर परतल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी विधानसभेत दिली.
पुढे बोलताना मंत्री परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरणाच्या मागणीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. तिचा अहवाल १२ आठवड्यांत येणार असून, त्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जे कर्मचारी करोनामुळे मृत्युमुखी पडले त्यांनाही महामंडळाने पाच लाख रुपये दिले आहेत. तसेच करोनाने मृत पावलेल्यांच्या वारसांपैकी २२२ अवलंबितांनी अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी अर्ज केले असून, ३४ अवलंबितांची नोकरीची प्रकरणे मंजूर करून आतापर्यंत १० वारसांना नोकरी देण्यात आल्याचे परब म्हणाले.
दरम्यान संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्याचे जाहीर करून कामावर रुजू न झाल्यास कारवाई करण्याचे जाहीर केल्यानंतर गुरुवारपर्यंत २ हजार ३६९ एसटी कर्मचारी कामावर परतले आहेत. शुक्रवारपासून कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फीच्या कारवाईला सुरुवात करणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम