अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- व्याजापोटी एका शेतकऱ्याची विहीर स्वतःच्या नावावर करून तिची परस्पर विक्री करणाऱ्या कर्जत तालुक्यातील तीन सावकारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अशोक रामदास शिंदे, राजेंद्र महादेव कापरे (दोघेही रा.कापरेवाडी ता.कर्जत),विशाल उर्फ भाऊ जगताप (रा.सुपे ता.कर्जत) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सावकारांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी नाना किसन धनवडे (रा.कापरेवाडी सध्या धायरी फाटा,पुणे) यांनी सन २०१७ साली शेतीच्या कामासाठी अशोक शिंदे याच्याकडून ४५ हजार व विशाल उर्फ भाऊ जगताप याच्याकडून ५० हजार व्याजाने घेतले.
शेतातील उत्पन्न न निघाल्याने फिर्यादीला व्याज देता आले नाही तेंव्हा तिघेही फिर्यादिस धमकावू लागले. त्यामुळे सन २०१८ साली फिर्यादीने कर्जत पोलिसात तक्रारी अर्ज दिला होता.
मात्र यापुढे कसलाच त्रास देणार नाही व व्याजही घेणार नाही म्हणत समझोता करून हा अर्ज मागे घेण्यात आला. त्यानंतर तिघांनीही फिर्यादीच्या घरी येऊन ‘अशोक शिंदे यांच्याकडून ३ लाख घेतले असल्याची नोटरी करून दे आणि तू जर ऐकले नाही तर तुला बघून घेतो’ असे म्हणत दबाब टाकत नोटरी करून घेतली.
त्याबदल्यात त्यांनी फिर्यादीची विहीर लिहून घेतली. पैसे परत केल्यावर विहीर पुन्हा नावावर करून देण्याचे ठरले होते. त्यानंतर तीनही आरोपी फिर्यादीच्या घरी येऊन ‘तुझी विहीर राजेंद्र कापरेच्या नावे करून दे’ अशी दमदाटीने मागणी केली व कर्जत शिवारातील विहीर बळजबरीने नावे करून घेतली .
राजेंद्र कापरेने ती विहीर ३ लाखाला विकली व रक्कम तिघा आरोपींनी वाटून घेतली. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम