अहिल्यानगर- दारूच्या नशेत मित्रांमध्ये चेष्टा-मस्करी सुरू होती, पण ती वादात बदलली आणि एका तरुणावर हल्ला झाला. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रोहित लक्ष्मण अडागळे (वय २६, रा. रेल्वे स्टेशन, पंचशीलनगर) असं या जखमी तरुणाचं नाव आहे. त्याने रुग्णालयातून दिलेल्या जबाबानुसार, कोतवाली पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कुणाल सुधाकर भालेराव आणि सोनू सुधाकर भालेराव (दोघेही रा. रेल्वे स्टेशन, पंचशीलनगर) अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावं आहेत. ही घटना बुधवारी, २६ मार्चला दुपारी आगरकर मळा लिंक रस्त्यावर घडली.
रोहित अडागळे आपल्या मित्रासोबत भोसले लॉन इथं लग्न समारंभाला जायला निघाले होते. वाटेत आगरकर मळा लिंक रस्त्यावर एका शेताच्या कडेला ते थांबले असताना ही घटना घडली.
तिथं कुणाल आणि सोनू भालेराव आले. त्याच वेळी करण गायकवाड नावाच्या मित्राने सगळ्यांना दारू पार्टी दिली. नशेत असताना करण आणि सोनू यांच्यात चेष्टा-मस्करी सुरू झाली, पण ती हळूहळू वादात बदलली.
हा वाद शांत करण्यासाठी रोहित अडागळे यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, पण त्याचा उलटाच परिणाम झाला. कुणाल आणि सोनू यांनी रोहितवरच हात उगारला आणि त्यांना धक्काबुक्की केली. शेवटी रोहित घरी परतला.
पण हे प्रकरण इथंच थांबलं नाही. रोहितच्या मागोमाग कुणाल आणि सोनू त्यांच्या घरापर्यंत आले. तिथं कुणालने रोहितच्या डोक्यात काचेची बाटली फोडली.
या हल्ल्यात रोहित गंभीर जखमी झाला आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागलं. पोलिसांनी रोहितच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. दारूच्या नशेतली ही चेष्टा किती महागात पडली, हे या घटनेतून दिसून येतं.