बारामती : आजकाल शेतीचे (Farming) प्रश्न गंभीर बनत चालले आहेत. मात्र त्यावर तोडगाही शेतकऱ्यांनाच (Farmer) काढायचा आहे. शेतकऱ्यांना नफा मिळवायचा असेल तर एकत्र शेती पद्धत (Combined farming method) अवलंबणे गरजेचे आहे. बारामती (Baramati) तालुक्यातील जळगाव सुपे (Jalgaon Supe) या गावातील काही शेतकऱ्यांनी अशीच एक संकल्पना गावातील शेतकऱ्यांपुढे मांडली आहे.
जळगाव सुपे या गावातील शेतकऱ्यांनी बारामती ॲग्रोस्टार फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. (Baramati Agrostar Farmer Producer Company Ltd.) या कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीमार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांमार्फत लाभ देण्यात येणार आहे.
कृषी विज्ञान केंद्र(KVK) बारामती यांच्या मार्गदर्शना खाली बारामती अॕग्रोस्टार कंपनीची स्थापना झाली असून केव्हीके बारामती टीमच्या सहकार्याने कंपनीची यशस्वी वाटचाल सुरू आहे. यात केव्हीके बारामतीचे खूप मोठे योगदान आहे.
“बारामती ॲग्रोस्टार फार्मर प्रोड्यूसर कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या उत्पन्नांत वाढ कशी होईल आणि तसेच शेतकऱ्यांना विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा होईल यावर जास्त भर देण्यात येणार आहे.
तसेच कंपनी जरी शून्यातून पुढे सरसावत असली तरी एक ना एक दिवस जगापुढे उत्तम उदाहरण बनेल अशी प्रतिक्रिया कंपनीचे संचालक अनिल वाघ यांनी दिली आहे”.
कंपनीच्या संचालक मंडळाने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान बारामती तालुक्यातील जळगाव सुपे गावातील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या केंद्र शासनाच्या FPO स्कीम अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी ची माहिती व कंपनीच्या माध्यमातून उत्पादित करीत असलेल्या खाद्यतेल (शेंगदाणा तेल, करडई तेल व सूर्यफूल तेल) या उत्पादनाची माहिती दिली.
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेती करून उत्पादित मालावर प्रक्रिया उद्योग सुरू करावे व शेतीचे उत्पादन व उत्पन्नांत वाढ करावी असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
तसेच या शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यासोबत जळगाव सुपे व परिसरातील शेती विषयक, जलसंधारण पायाभूत सुविधा शेतीच्या पाण्याचा प्रश्न भौगोलिक परिस्थितीनुसार पीक पद्धतीत बदल, शैक्षणिक सुविधा यासांरख्या अनेक विषयांवर सविस्तर सखोल चर्चा केली.
यावेळी शेतकऱ्यांनी पवार साहेबांना पाणी फाउंडेशन अंतर्गत गट शेती स्पर्धेमध्ये कमी पाण्यावर अधिक उत्पादन देणारी पिके (तूर मूग बाजरी मेथी कोथिंबीर सोयाबीन मका) घेण्यात येणार आहे अशी माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या या उपक्रमाबद्दल पवार साहेबांनी त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी गट शेती प्रयोग यशस्वी करावा त्याची पाहणी करण्यासाठी मी नक्कीच येईल अशी ग्वाही पवार साहेबांनी दिली आहे.
यावेळी शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
या भेटी प्रसंगी बारामती ऍग्रोस्टार फार्मर प्रोडूसर कंपनी चे चेअरमण सुनिल जगताप संचालक अनिल वाघ, नेहरू युवा केंद्र प्रतिनिधी वैभव भापकर, आनंदराव खोमणे, संतोष जगताप, स्वपनिल जगताप आदी उपस्थित होते.