उत्तर महाराष्ट्रात उभं राहणार ‘युनोव्हेशन सेंटर’चं जाळं – आ. सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नातून पाच जिल्ह्यांत युनोव्हेशन सेंटर

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : देशाचं भविष्य तरुणांच्या हाती असताना या तरुणांचं भविष्य घडवण्यासाठी राज्य सरकारकडे स्वतंत्र युवक कल्याण विभाग अस्तित्त्वात नाही.

अशा वेळी या तरुणांच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी तरुणांच्या कल्पकतेला आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी युनोव्हेशन सेंटर ही संकल्पना आखली.

विशेष म्हणजे राज्य शासनाने या संकल्पनेला मंजुरी दिल्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये एक-एक युनोव्हेशन सेंटर उभारण्याचं काम सुरू झालं आहे.

यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्याशिवाय नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार अशा पाचही जिल्ह्यांमध्ये मिळून ५० जयहिंद युथ क्लब उभारण्यात येणार असून या सर्व क्लबचं काम सुरू झालं आहे.

राज्य सरकारच्या अखत्यारीत तरुणांच्या विकासासाठी एक स्वतंत्र विभाग अस्तित्त्वात नाही. युवक कल्याण विभाग हा क्रीडा विभागाशी संलग्न आहे. तरुणांसाठीच्या विविध योजना या विभागामार्फत राबवल्या जातात.

युवकांना योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, त्यांच्या कल्पकतेला व उद्योजकतेला चालना मिळावी, या हेतूने आमदार सत्यजीत तांबे यांनी युनोव्हेशन सेंटरची संकल्पना पावसाळी अधिवेशनात मांडली होती.

विशेष म्हणजे या योजनेला राज्य सरकारने मंजुरी देत सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये एक-एक युनोव्हेशन सेंटर उभारण्यासाठी निधी देऊ केला.

त्याच जोडीने उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये मिळून जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून छोट्या छोट्या क्लस्टर लेव्हलचे ३०० जयहिंद युथ क्लब उभारले जाणार आहेत.

या युथ क्लबमध्ये शिक्षण, उद्योजकता, नोकरी व जीवनावश्यक मूल्ये या बाबींवर जास्त भर दिला जाणार आहे. हे युथ क्लब जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या युनोव्हेशन सेंटरशी संलग्न असतील.

या ३०० पैकी ५० युथ क्लबच्या उभारणीला मंजुरी मिळाली असून त्यांच्या उभारणीचं काम सुरू झाल्याची माहिती आ. सत्यजीत तांबे यांनी दिली. या युनोव्हेशन सेंटरच्या कामाचा आढावा घेऊन पुढे ही संकल्पना राज्यभरात राबवण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चौकटी

काय असेल युनोव्हेशन सेंटर?

तरुणांसाठी राज्य, देश, विदेशातील शिक्षण, व्यवसाय, करिअर, नोकरी यासंबंधीची इत्थंभूत माहिती

स्कॉलरशिप, विविध विद्यापीठांच्या, अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया, करिअर गायडन्स आदींची माहिती

सरकारी व खासगी क्षेत्रांतील नोकरीच्या संधी, स्पर्धा परीक्षेची माहिती

नवउद्यमींसाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती. आर्थिक भांडवल कसे उभारायचे, व्यवसाय कसा सुरू करायचा, उद्योगधंद्यांतील खाचखळगे कसे ओळखायचे आदींबाबत मार्गदर्शन करण्यासोबतच कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम

राजकीय साक्षरता, आर्थिक साक्षरता, आरोग्याची देखभाल यांसारखी चांगली जीवनमूल्ये अंगीकारण्याची आवड

ग्रामीण युवकांना वाचनालय, अभ्यासिका, स्टार्ट-अप्ससाठी को-वर्किंग स्पेस आदी सुविधा

देशाचं भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प!

आज आपल्या देशातला तरुण ही आपली सॉफ्ट पॉवर आहे. पण हा तरुण शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम नसेल, तर ही ताकद वाया जाईल. तरुणांचा अष्टपैलू विकास करण्यासाठी युनोव्हेशन सेंटर ही संकल्पना मला सुचली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या संकल्पनेला पाठिंबा देत सध्या उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक युनोव्हेशन सेंटर आणि एकूण ५० जयहिंद युथ क्लबच्या उभारणीला मंजुरी दिली आहे.

याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. उत्तर महाराष्ट्रात पुढल्या तीन वर्षांत ३०० युथ क्लब उभारण्याचा माझा मानस आहे. ही केंद्रं लवकरच सुरू होतील आणि तरुणांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्व विकासात मोलाची भूमिका बजावतील. – आ. सत्यजीत तांबे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe