अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- ज्योती देवरे यांची बदली झाल्यापासून पारनेरचे तहसीलदारपद रिक्त होते. यामुळे येथील प्रभारी कारभार नायब तहसीलदार गणेश आढारी यांच्याकडे देण्यात आला होता.
मात्र, सरकारी अधिकारी असतानाही नागरिकांचे कामे रखडत असल्याने मोठी ओरड निर्माण झाली होती. वाढता आक्रोश पाहता अखेरीस पारनेरच्या तहसीलदारपदाचा अतिरिक्त कार्यभार नगरचे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर निकम यांच्याकडे सोपविण्यात आला.
तसा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढला आहे. वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगाव येथे बदली झाली.
तेव्हापासून पारनेर तालुक्याला पूर्ण वेळ तहसीलदार नाही. गेल्या महिन्यात नव्याने पारनेर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून बदलून आलेल्या गणेश आढारी यांच्याकडे तहसीलदारपदाचा प्रभारी पदभार सोपविला.
मात्र, त्यांनी ठरावीक सह्या करण्याशिवाय कोणतेच काम केले नाही. अनेक वेळा शैक्षणिक दाखलेसुद्धा विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत. शेतकरी तसेच तहसील कार्यालयात असलेली नागरिकांची इतरही कामे मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती.
त्यामुळे जनतेकडून संताप व्यक्त केला जाऊ लागला होता. अखेर नागरिकांच्या मागणीला यश आले असून पारनेरच्या तहसीलदारपदाचा अतिरिक्त कार्यभार निकम यांच्या खांद्यावर सोपवण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम