अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, संसर्ग झाला तर कशाप्रकारे उपाययोजना करावी याबाबत जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांच्या माध्यमातून ग्रामीण स्तरापर्यंत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
त्यासंदर्भातील नियोजन तयार करुन त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसांत सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिली. लहान मुलांमधील कोरोना संसर्ग टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनासंदर्भात नेमलेल्या जिल्हास्तरीय बालरोगतज्ज्ञ टास्क फोर्स समितीची आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.
त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एन. दहिफळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स. वि. सोलाट, डॉ. पालेकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. गणेश मिसाळ, डॉ. जयदीप देशमुख, डॉ. सुचित तांबोळी,
डॉ. आशीष कोकरे, डॉ. चेतना बहुरुपी यांच्यासह भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, सध्या दुसऱ्या लाटेत रुग्णवाढ मोठ्या झपाट्याने वाढली. संसर्गाचा वेग जास्त होता. तरुणांबरोबरच काही प्रमाणात मुलांनाही संसर्ग झाल्याचे आढळून आले. मात्र, संभाव्य तिसऱ्या लाटेत संसर्गाचा धोका लहान मुलांना जास्त असल्याची भीती व्यक्त होत आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासन म्हणून आणि आरोग्य यंत्रणा म्हणून आपण त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी तयार असले पाहिजे. लहान मुलांनी काय काळजी घ्यावी, त्यांच्या पालकांनी काय काळजी घ्यावी, लक्षणे आढळल्यास उपचार पद्धती, त्यासाठी तालुकास्तरावरील यंत्रणांची तयारी आदीबाबत त्यांनी या बालरोगतज्ज्ञांनी तपशीलवार चर्चा केली.
लहान मुलांना संसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी जिल्ह्यात कशा प्रकारे करता येईल. मुलांच्या दृष्टीने आरोग्य सुविधांमध्ये आणखी काय वाढ करावी लागेल याचीही चर्चा या बैठकीत करण्यात आली.
कोरोनापासून बचावासाठी लहान मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी काय काळजी घ्यावी याबाबत जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांनी सर्वसामान्यांना समजेल अशा प्रकारे माहिती तयार करावी. तसेच, ग्रामस्तरावरील आशा, अंगणवाडी सेविका यांनाही त्याअनुषंगाने प्रशिक्षित करण्याची सूचना त्यांनी केली.
डॉक्टरांनी दिलेला सल्ला आणि घ्यावयाची काळजी याची माहिती ग्रामीण भागापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांच्या माध्यमातून कार्यवाहीच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये बालरोगतज्ज्ञांची पुरेशी संख्या नाही.
त्यामुळे भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेने पुढाकार घेऊन याकामी प्रशासनाबरोबर हातात हात घालून सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. संभाव्य कोरोना संसर्गाची लाट वेळीच थोपविली आणि त्याबाबतची पूर्वकाळजी घेतली गेली तर आपण त्याचा यशस्वी सामना करु शकू,
असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित बालरोगतज्ज्ञांनीही त्यांची मते मांडली. सर्वांनी मिळून या संकटाचा सामना करु, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासनाला करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम