कर्जत तालुक्यातील फोटोग्राफर असोसिएशनने शासनाकडे एक अनोखी मागणी केली आहे. राज्य सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच लोकप्रिय झालेली असताना, आता फोटोग्राफी क्षेत्रातील व्यावसायिकांसाठीही अशीच एक योजना सुरू करावी, अशी विनंती पुणे जिल्ह्यातील दौंड येथील फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी केली आहे.
कर्जत तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे रेहकुरी येथे आयोजित स्नेहमेळाव्यात ही मागणी जोरकसपणे मांडण्यात आली. या मेळाव्यात कॅमेरापूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि कर्जतसह दौंड येथील अनेक फोटोग्राफर उपस्थित होते.

सचिन गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, फोटोग्राफी क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंतांना आर्थिक आधार देण्यासाठी ‘लाडका फोटोग्राफर योजना’ सुरू करणे गरजेचे आहे.
त्यांनी फोटोग्राफरांसमोरील वाढती महागाई, कॅमेऱ्याच्या किमती, शाई आणि कागदाच्या खर्चातील वाढ यासारख्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. या क्षेत्रातील व्यावसायिकांना उदरनिर्वाह करताना मुलांचे शिक्षण, कर्ज आणि मोबाइल तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या स्नेहमेळाव्यात फोटोग्राफीच्या दरवाढीवरही चर्चा झाली. साखरपुडा, लग्न, वाढदिवस आणि इतर सामाजिक समारंभांसाठीच्या फोटोग्राफीच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार, नवीन दरपत्रक तयार करून सर्व छायाचित्रकारांना वितरित करण्यात आले.
कार्यक्रमात सचिन पोटे, नितीन कोल्हे, आकाश बिडगर, अजित अनारसे, राजेंद्र खैरे, योगेश लांडगे, कैलास पंडित यांनी आपली मते मांडली. यावेळी कर्जत तालुका फोटोग्राफर असोसिएशनची नवीन कार्यकारिणीही निवडण्यात आली.
तालुकाध्यक्षपदी उमेश जपे, उपाध्यक्षपदी भरत तुपे, सचिवपदी आकाश बिडकर, कार्याध्यक्षपदी महेश जाधव आणि खजिनदारपदी तुकाराम सायकर यांची निवड झाली. संचालक म्हणून बबन कोरे, महिंद्र उघडे, अजित अनारसे, नितीन काळे आणि सुनील शेटे यांची बिनविरोध निवड झाली.
सूत्रसंचालन भाऊसाहेब गायकवाड यांनी केले, तर शिरीष यादव यांनी आभार प्रदर्शन केले. या मेळाव्यातून फोटोग्राफरांच्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न झाला असून, सरकार या मागणीवर काय भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.