अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- राज्यातील निर्बंध कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रादुर्भावाचा धोका आणि तिसऱ्या लाटेचा इशारा या पार्श्वभूमीवर पुन्हा कठोर करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.
हे जुनेच निर्बंध सोमवारपासून नव्याने लागू होणार आहेत.कठोर केलेल्या निर्बंधांनुसार सर्व दुकाने दुपारी ४ पर्यंतच खुली ठेवता येतील, तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील.

नागरिकांना सायंकाळी ५ नंतर रस्त्यावर फिरता येणार नाही.मुंबईतील निर्बंध आणखी तीन महिने कायम ठेवण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. सर्व मॉल्स बंद राहतील. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना किमान तीन महिने तरी दिली जाणार नाही,
असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर निर्बंध अधिक कठोरपणे लागू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यावर राज्य सरकारने पाचस्तरीय रचना तयार केली होती.
त्यानुसार रुग्णसंख्या, संसर्गदर आणि प्राणवायूच्या उपलब्ध खाटा या आधारे शहरे आणि जिल्ह्यांची श्रेणीरचना दर आठवड्याला निश्चित केली जात होती. गेल्या तीन आठवड्यांत पाचस्तरीय रचनेनुसार निर्बंध शिथिल करण्यात आले होते,
परंतु निर्बंध शिथिल करण्यात आल्यावर गर्दी झाल्याचे आणि नागरिकांनी नियमोल्लंघन सुरू केल्याचे सरकारला आढळले, असे मुख्य सचिव सीताराम कुं टे यांनी लागू के लेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.
कोरोना रुग्णसंख्येत झालेली वाढ,काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक असलेला संसर्गदर, करोना विषाणूचा उत्परिवर्तित ‘डेल्टा प्लस’ हा प्रकार आणि त्याचे रत्नागिरी,
जळगावसह अन्य जिल्ह्यांमध्ये आढळलेले रुग्ण हे सर्व मुद्दे लक्षात घेऊनच निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. नव्या निर्बंधांनुसार पहिले दोन स्तर रद्द करण्यात आले आहेत. सध्या पहिल्या आणि दुसऱ्या स्तरातील जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या स्तरात होईल.
तिसऱ्या स्तरात अनेक निर्बंध आहेत. याशिवाय रुग्णसंख्या, संसर्गदर याचा आढावा घेऊन महापालिका आयुक्तकिं वा जिल्हाधिकाऱ्यांना निर्बंध अधिक कठोर करण्याचे अधिकार दिले आहेत.
स्थानिक पातळीवर आदेश लागू झाल्यापासून नवे निर्बंध लागू होतील. ‘अॅन्टिजेन’ऐवजी ‘आरटी-पीसीआर’ या चाचण्यांच्या अहवालाच्या आधारेच साप्ताहिक संसर्गदर निश्चित करण्याची तरतूद नव्याने करण्यात आली आहे.
लसीकरणाच्या मोहिमेला प्राधान्य देतानाच राज्यातील पात्र लोकसंख्येपैकी ७० टक्के नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
कोरोना नियम-निर्बंधांचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्याची तरतूद नव्या आदेशात करण्यात आली आहे. विवाह समारंभ किंवा अन्य कार्यक्रम तसेच उपाहारगृहांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
गर्दी होणारे समारंभ, कार्यक्रम आदींना परवानगी न देण्याचे आदेश सर्व शासकीय यंत्रणांना देण्यात आले आहेत. रुग्णसंख्या किंवा संसर्गदर कमी झाल्यास लगेचच निर्बंध शिथिल करू नयेत.
यासाठी दोन आठवड्यांच्या रुग्णसंख्येच्या आकडेवारीचा आढावा घेऊनच निर्बंध कमी करण्याचा विचार करावा. तसेच रुग्णसंख्या वाढल्यास तात्काळ निर्बंध अधिक कठोर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या निर्बंधांची सोमवारपासून अंमलबजावणी केली जाईल. पुढील दोन दिवसांत महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरील निर्बंधांबाबतचे आदेश जारी करावेत,
अशी सूचना देण्यात आली आहे. उपनगरी रेल्वे प्रवासाची परवानगी दिली जाईल, या आशेवर असलेल्या महानगर क्षेत्रातील प्रवाशांना त्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल.
निर्बंध अधिक कठोर करण्यात आल्याने मुंबईत किमान तीन महिने तरी रेल्वे प्रवासाला परवानगी अशक्य असल्याचे संके त सरकारी सूत्रांनी दिले. मुभा दिल्यास रुग्णसंख्या वाढेल, असा इशारा कृतिदलाने दिला आहे.
शिक्षकांना रेल्वे प्रवासास मुभा देण्याचे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते, परंतु अत्यावश्यक सेवा वगळून कोणालाही रेल्वे प्रवासाची परवानगी दिलेली नाही.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली शहरांसह संपूर्ण जिल्ह्यात आता तिसऱ्या स्तरातील नियम लागू असणार आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम