अहमदनगर ब्रेकींग: जिल्हा रूग्णालय अग्निकांड; डॉ. पोखरणांचे…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022  Ahmednagarlive24 :-जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी निलंबित करण्यात आलेले तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे.

राज्यपालांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979मधील नियम 4 च्या पोटनियम (5) खंड (क) अन्वये प्रदान केलेल्या विशेषाधिकाराचा वापर करून डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द केले आहे.

त्यांना शिरूर (जि. पुणे) येथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे. तसा आदेश महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी वैभव ग. कोष्टी यांच्या स्वाक्षरीने पारित करण्यात आला आहे.

जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबर, 2021 रोजी आग लागून 14 रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 9 नोव्हेंबर,

2021 रोजी या घटनेप्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना निलंबित करण्यात आले होते. अग्निकांड प्रकरणी ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे.

परंतु त्यांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविलेला आहे. सिव्हील अग्निकांड प्रकरणी गेल्या चार महिन्यांपासून प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात कोणावरही ठोस कारवाई झालेली नाही.

राज्य सरकारने चौकशी समिती नेमली. तिचा अहवाल आला तरी तो अद्याप उघड झालेला नाही. त्यामुळे घटनेला जबाबदार कोण, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. चार महिने उलटूनही मृत 14 रुग्ण न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe