अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात चंदनापुरी घाटात आज बुधवारी पहाटे धावत्या टेम्पोला अचानक आग लागली. या टेम्पोमधून मध्य प्रदेशातील भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नेण्यात येत होत्या.
र्घटनेत प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या असून या प्रश्नपत्रिका बारावीच्या असल्याची माहिती मिळते आहे. पुणे बोर्डाला याची माहिती कळवण्यात आली असून त्यांच्या उपस्थितीत पंचनामा केला जाणार आहे.
त्यानंतर या नेमक्या कोणत्या प्रश्नपत्रिका होत्या, हे स्पष्ट होईल नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात हॉटेल साईप्रसादसमोर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर टेम्पोने (क्रमांक एम. पी. ३६ एच. ०७९५) पाठीमागील बाजूने अचानक पेट घेतला.
आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबवला. चालक मनीष चौरसिया व मॅनेजर रामविलास राजपूत यांनी ही आग अटोक्यात आणण्याचं काम सुरू केलं.
आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, अंमलदार कैलास देशमुख घटनास्थळी गेले.
संगमनेर नगर परिषद आणि संगमनेर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग अटोक्यात आणली.
महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या दुर्घटनेनंतर नाशिक-पुणे वाहतूक काही काळासाठी जुन्या घाटातून वळवण्यात आली आहे.