अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagarlive24 :-पारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गळा दाबून निर्घृन खून 2021 मध्ये करण्यात आला होता.
या मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात अत्याचार आणि खून तसेच बाल लौंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी या गुन्ह्यात अनेक संशयितांची सखोल चौकशी केली होती. या चौकशीअंती आरोपी अमोल उर्फ बाळू देशमुख (वय 38) याला अटक करण्यात आली होती.
दरम्यान आरोपी अमोलच्या वतीने न्यायालयात नियमित जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश मंजुषा देशपांडे यांनी अर्ज फेटाळला आहे.
जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी सरकारतर्फे तर मूळ फिर्यादीतर्फे वकील सचिन पटेकर यांनी सहाय्य केले. फिर्यादीमध्ये आरोपीच्या नावाचा उल्लेख नाही.
आरोपीविरुद्ध ठोस स्वरुपाचे पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे नियमित जामीन द्यावा, असे म्हणणे सादर केले. जिल्हा सरकारी वकील पाटील यांनी हे म्हणणे खोडून लावले.
आरोपीचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. त्याच्याविरुद्ध परिस्थितीजन्य पुरावे आहेत. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा आणि मोबाईलची तपासणीचा अहवालाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जामीन देऊ नये, असे म्हणणे सादर केले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे.