अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- टोळक्याने तरूणावर तलवार, कुर्हाड व लाकडी दांडक्याने खूनी हल्ला केला. नालेगावातील वारूळाचा मारूती कमानीजवळ ही घटना घडली.
या हल्ल्यात अनिल लक्ष्मण गायकवाड (वय 32 रा. माळीवाडा, अहमदनगर) हा तरूण जखमी झाला आहे. त्याच्यावर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर दीपक देठे, राहुल दीपक देठे, निलेश देठे, दीपक देठे, दीपक देठे याची पत्नी (पूर्ण नाव माहिती नाही,
सर्व रा. नालेगाव, अहमदनगर) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. अनिल गायकवाड त्यांच्या दुचाकीवरून दिल्लीगेट येथून माळीवाडा येथे जात असताना
त्यांना सागर देठे याने नालेगावातील वारूळाचा मारूती कमानीजवळ थांबविले व त्यांच्या कानाखाली मारली. अनिल यांनी कानाखाली मारल्याचा जाब विचारला असता राहुल, निलेश, दीपक व त्याची पत्नी हे तेथे आले.
त्यांनी अनिल यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. दीपक याने त्याच्याकडील कुर्हाडीने अनिल यांच्या हातावर मारली तर सागरने त्याच्याकडील तलवारीने अनिलच्या डोक्यावर वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या अनिलवर अहमदनगर येथील हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याने पोलिसांना जबाब दिला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.