Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर नवे संकट ! चिंतेचं सावट…

Published on -

Ahmednagar News :  पावसाळ्याचे अर्धे दिवस उलटल्यानंतरही जिल्ह्यातील शिवारावर दुष्काळी चिंतेचे सावट कायम आहे. २५ ऑगस्टचा विचार केला असता सरासरीच्या तुलनेत अवघा चाळीस टक्के पाऊस झाला आहे.

जलाशयांचा घसा अद्याप कोरडाच !

तीन महिन्याच्या काळात झालेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या उत्तर भागातील भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा या धरणातील पाणीसाठा दिलासादायक असला तरी जिल्ह्याच्या दक्षिण परिसरातील मांडओहोळ, घाटशीळ, सीना, खैरी, विसापूर या जिरायताच्या शिवारातील ‘जलाशयांचा घसा अद्याप कोरडाच राहिला असल्याचे वास्तव परिस्थिती आणि प्रशासनाकडील पाणीसाठ्याच्या ‘ताळेबंदावरून स्पष्ट होत आहे.

बहुतांश शेत-शिवाराची मतदार ही पावसावर

कृषिप्रधान जिल्हा ही अहमदनगर जिल्ह्याची ओळख होय. त्यातही भंडारदरा, मुळा, नांदूरमधमेश्वर, कुकडी या प्रकल्पांच्या ओलिताखालील क्षेत्र वगळता जिल्ह्यातील बहुतांश शेत-शिवाराची मतदार ही पावसावर अवलंबून आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचे अर्थचक्र खरीप आणि रब्बीच्या उत्पन्नावरच गतिमान होते. त्यामुळे पावसाच्या वाटेकडे जिल्ह्याचे नेहमीच डोळे लागलेले असतात.

गेल्यावर्षी जास्त प्रमाणात बरसलेला पाऊस यावर्षी जिल्ह्याच्या शिवाराकडे अद्यापपर्यंत पाठ फिरवून बसला आहे. सध्या पावसाळी मघा नक्षत्र सुरु आहे. या आधीची मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य आणि पाचवे आश्लेषा हे नक्षत्र तुरळकच बरसले. सहावे नक्षत्र म्हणजे मघा दि.१७ ऑगस्ट रोजी सुरु झाले.

पावसाची सरासरी ४४८.१ मिलिमीटर

मात्र तेही मागील आठ दिवसांपासून कोरडेच जात आहे. जिल्ह्याची पावसाची सरासरी ४४८.१ मिलिमीटर आहे. २५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्याच्या शिवारात सरासरी २८२.६ मिलिमीटर पाऊस होत असतो.मात्र यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने रुसवा धरला. अपुऱ्या पावसावरती खरिपाचा पेरा झाला. खरिपाची पिके जोमाने वाढण्यासाठी आवश्यक पाऊस झाला नाही.

अवघा १८५.८ मिलिमीटर पाऊस

दोन महिन्यापासून शिवारावर आभाळ दाटलेले आहे.या आभाळी छायेखाली शिवारातील पिके हिरवी दिसत असली तरी त्यात म्हणावा तो अपेक्षित जोम राहिला नाही. शुक्रवार २५ ऑगस्टपर्यंतची आकडेवारी पाहता जिल्ह्यात अवघा १८५.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील पाणीसाठा

पर्जन्यमान कमी झाल्यामुळे भंडारदरा जलाशय वगळता जिल्ह्यातील एकही धरण पूर्ण भरल नाही. भंडारदरा जलाशयात आजमितीस असलेला पाणीसाठा ९७%, निळवंडे ८२ टक्के, मुळा ८० टक्के, आढळा ८५ टक्के असा आहे. तर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तलावांची तहान अद्यापही बळवलेली आहे. दक्षिण जिल्ह्यातील तलावांमध्ये नगण्य पाणीसाठा आहे. मांड ओहोळ साडेसात टक्के, घाटशीळ साडेसात टक्के, सीना २७%, खैरी १७% आणि विसापूर धरणात साडेपाच टक्के पाणीसाठा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe