सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहू नये. अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer News  : ४० टक्के निर्यातकर तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी काल शुक्रवारी स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली. यावेळी शेतकऱ्यांनी राहुरी येथे नगर- मनमाड राज्य महामार्गावर झोपून चक्काजाम आंदोलन केले.

पोलीस प्रशासनाने कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केल्याने आंदोलन चिघळल्याचे चित्र यावेळी दिसून आले.यावेळी आंदोलकांनी विविध मागण्या केल्या, त्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारणी मागे घ्यावी, तसेच कांद्याला सरसकट ३ हजार रुपये प्रतिकिंटल हमीभाव जाहीर करावा.

३१ मार्चपर्यंत खरेदी केलेल्या कांद्याला ३५० रुपये अनुदान देऊ केले, पण ते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. ते त्वरीत जमा करावे, या मागण्यांसाठी काल दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी येथे बाजार समीतीसमोर ‘नगर- मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. यावेळी अनेक कार्यकत्यांनी आपले मनोगत व्यक्‍त करून केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्‍त केला.

सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या चक्काजाम आंदोलनप्रसंगी राज्य महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलनकरत्यांची चांगलीच धावपळ झाली.

पोलिस प्रशासनाने रवींद्र मोरे ताब्यात घेतल्यानंतर दुपारी उशीरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरु होते. केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांवर वारंवार अन्याय होत आहे. आता शेतकर्‍यांची सहनशीलता संपली आहे. सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहू नये. अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी सरकारने ठेवावी, असा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आहे.