Ahmednagar Education News : सांगा गरिबांची पोर कशी शिकणार ? जिल्हा परिषद शाळांमध्ये वीज नसल्याने डिजीटल शिक्षणाचा खेळखंडोबा !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Education News

कर्जत तालुक्यात तब्बल ६८ जिल्हा परिषद शाळांमध्ये वीज नसल्याने येथील मुलांना डिजीटल शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. या शाळा कागदोपत्री जरी संपूर्ण डिजिटल असल्या तरी येथील मुलांना त्याचा प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २६९ प्राथमिक शाळा असून, यामध्ये १४६१४ विद्यार्थी शिक्षण घेतात. तालुक्यातील २६९ प्राथमिक शाळांमध्ये डिजीटल शिक्षणाची जरी सोय असली तरी यातील २०१ शाळाच मुलांना डिजीटल शिक्षण देत आहेत.

उर्वरित ६८ शाळांमध्ये वीजच नसल्याने येथील विद्यार्थी जुन्याच पद्धतीचे शिक्षण घेत आहेत तालुक्यातील २६९ प्राथमिक शाळांमध्ये डिजीटल शिक्षणासाठी ४१४ संगणक संच, २४१ स्मार्ट टीव्ही असून, यामध्ये २२९ एलईडी, १२ एलएफडी आहेत. १२१ अंड्रोईड टीव्ही आहेत. २१६ इंटरअॅक्टिव्ह बोर्ड आहेत.

१०७ टॅबलेट आहेत, ७७ प्रोजेक्टर असले तरी शासनाने इतर कोणतेही शैक्षणिक स्वॉफ्टवेअर उपलब्ध करून दिलेले नाही, अशी माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. कागदोपत्री ६८ शाळांमध्ये वीज नसली तरी काही शाळांमध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे तर काही शाळांना सोलरद्वारे वीज उपलब्ध झाली आहे, असे शिक्षकांशी संवाद साधला असता माहिती समजली.

मात्र, याची नेमकी आकडेवारी शिक्षण विभागाकडून मिळू शकली नाही, त्यामुळे याबाबत शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यातील ६८ शाळांमध्ये वीज नसल्याबाबत शिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे यांना विचारले असता,

शाळांचे वीजबिल भरण्याचे काम ग्रामपंचायतचे आहे तर मधल्या काळात जिल्हा परिषद बिल भरणार होते, यामुळे काही शाळांचे बिल भरायचे राहून गेले असू शकते, असे सांगताना शिक्षण विभागाकडे केंद्रप्रमुखाचे मनुष्य बळ कमी असल्याने माहिती अपडेट नसल्याचे म्हटले. अनेक शाळांमधील उपक्रमशील शिक्षकांच्या प्रयत्नामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकत आहेत.

शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून मुलांची गुणवत्ता वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळेतील मुले अग्रेसर राहावीत, यासाठी आ. रोहित पवार यांनी अनेक शाळांना ई- लर्निंगचे साहित्य दिलेले आहे. संगणकांवर, प्रोजेक्टरद्वारे एलसीडीद्वारे मुलांना विविध प्रकारचा अभ्यासक्रम शिकविला जात आहे. मात्र, या आधुनिक उपकरणांचा वापर करण्यासाठी ६८ शाळांमध्ये विजेची सोय नसल्याचे पुढे येत असेल तर येथील संगणक, ई-लर्निंगसह इतर साहित्य शोभेच्या वस्तू आहेत का, त्याचा मुलांना वापर कधी करता येणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe