Ahmednagar News : गेल्या २५-३० वर्षांपासून श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न तसेच आहेत. मी गेली चार ते पाच वर्षांपासून कुठल्याही राजकीय पक्षात नाही. जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्यातील, जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत असतो.
माझा कुठलाही पक्ष नाही. मी तालुक्यांतील सर्वच नेत्यांना मदत केलीय, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मला आमदार करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी केले बेलवंडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संवादयात्रा काढून तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांना आमदारकीचे वेध लागले आहेत. तालुक्यात कुकडीचा पाणीप्रश्न वीजप्रश्न, रस्ते, साकळाई, एमआयडीसी, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असून, त्यावर प्रत्येक वेळी विधानसभेची निवडणूक लढवली जाते.
आमदार झाल्यावर मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. राजकीय नेत्यांकडे स्वतःची कारखानदारी, शिक्षण संस्था असून, त्यावरच लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास त्यांना वेळ मिळत नाही. स्वतःच्या गावाच्या सहकारी संस्था, ताब्यात नाहीत, त्यांनाही आमदारकीचे स्वप्न पडत आहेत.
मी तालुक्यातील सर्वसामान्य माणूस असून, माझ्याकडे कुठलीही कारखानदारी किंवा शिक्षण संस्था नाही. आमदार झाल्यानंतर मला जनतेच्या कामासाठी सातत्यपूर्ण वेळ देता येईल, असे सांगून कुठल्याही पक्षाने मला उमेदवारी द्यावी, मी ती लढवण्यास तयार आहे.
त्याचप्रमाणे मी तालुक्यातील सर्वच नेत्यांना मदत केली आहे, म्हणूनच सर्वांनी मिळून मला आमदार करावे, असे आवाहन शेलार यांनी केले आहे. माजी आमदार राहुल जगताप यांनी अण्णासाहेब शेलार यांना शुभेच्छा देताना सांगितले, कीशेलार यांनी ग्रामपंचायत, सेवा संस्थाच्या माध्यमातून गावाचा विकास केला आहे.
जिल्हापरिषदेच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम केले. त्यामुळेच बेलवंडीसारख्या गावाने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मुलाला तीन हजारांच्या मताधिक्याने सरपंच केले. मात्र, तालुक्यातील काही नेत्यांचा आपल्या गावावर पगडा राहिलेला नाही, उलट त्यांच्या मुलांनाही पराभवास सामोरे जावे लागल्याचा टोला जगताप यांनी लगावला.
विधानसभेची तयारी करण्यासाठी अनेकांनी संवाद यात्रा, परिवर्तन यात्रा सुरू केले आहे. तालुक्यातील जनता, शेतकरी, कुकडी पाणी, साकळाई, विजेचा, रस्त्याचे प्रश्न भेडसावत असून, त्याकडे प्रस्थापित नेते दुर्लक्ष करीत आहेत. यात्रा, जत्राकरून कोणी आमदार होत नाही, त्यासाठी जनतेचे प्रश्न हाताळावे लागतात, असा टोलाही शेलार यांनी लगावला.