Ahmednagar News : देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रपती भवनात झालेल्या मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजप, शिवसेना, टीडीपी, लोकजनशक्ती आदी पक्षांच्या ४५ हून अधिक खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
परंतु मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या नाराजीचे पडसाद सोमवारीच्या षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात उमटण्याची शक्यता आहे.
सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन असून, त्यानिमित्ताने माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे. या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान मिळेल, अशी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आशा होती. राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हे मंत्रीपदाच्या शर्यतीत होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष मोदी सरकारच्या शपथविधीकडे लागले होते.
परंतु मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच भ्रमनिरास झाला असून, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. यासंदर्भीत आज होणाऱ्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात नेते आणि कार्यकर्त्यांमधून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
दरम्यान आगामी काळात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार यात अजित पवार गटाला झुकते माप मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागल्या आहेत.