Ahmednagar Politics : खासदार विखेच आमदार जगतापांचा 2024 मध्ये करेक्ट कार्यक्रम करतील !

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Ahmednagar politics news vikhe vs jagtap :-लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणारे विखेच जगतापांचा २०२४ मध्ये करेक्ट कार्यक्रम करतील, काळेंची भविष्यवाणी ; विखे हे चतुर खासदार, गाढवाला गोपाळ शेठ कसे करायचे हे त्यांना चांगले माहीत आहे

अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा उड्डाणपूल खासदारांमुळे पूर्ण झाला आहे. याबद्दल मी त्यांचे नगरकरांच्या वतीने आभार मानतो.

शेवटी ते काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले आहेत. आज लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये असणारे विखेच २०२४ मध्ये जगतापांचा राहुरी-नगर मतदारसंघात “त्यांचा” केला तसाच “करेक्ट कार्यक्रम” करतील, अशी भविष्यवाणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.

“विखे-जगताप यांची लिव्ह-इन-रिलेशनशिप” या मथळ्याखाली एका दैनिकातून लेख प्रसिद्ध झाला होता. समाज माध्यमांवर तो चांगलाच व्हायरल झाला असून त्याची शहरासह जिल्ह्यामध्ये सुरू झालेली चर्चा अजूनही थांबायला तयार नाही. यावरून आता विखे-जगताप-काळे यांनी चांगलीच राजकीय टोलेबाजी केली आहे.

एका पतसंस्थेच्या कार्यक्रमात या नात्यातून विकासाची अपत्ये जन्माला येत असल्याचा दावा विखे यांनी केला होता. जगताप यांनी देखील त्यात हवा भरली होती.

त्यानंतर आता काळे यांनी विखे हे चतुर खासदार असल्याचे म्हणत उड्डाणपुलाचे काम करून घेण्यासाठी गाढवाला गोपाळशेठ कसे करायचे हे त्यांना चांगलेच ठाऊक असल्याचे म्हणत जगताप यांच्यावर राजकीय निशाणा साधला आहे.

काळे यांनी म्हटले आहे की, अनेकांनी अनेक वर्ष उड्डाणपुलाच्या कामाचे अनेकवेळा भूमिपूजन केले. मात्र केवळ विखेंनीच ते काम धसास लावून दाखवले.

यासाठी त्यांना मी शंभर पैकी शंभर गुण देतो. शेवटी लोकप्रतिनिधी या नात्याने ते त्यांच कर्तव्यच आहे. अंधारात कोणाला भेटायचे नाही अशी वडिलांची शिकवण असल्याचे छोटे जगताप म्हणाले.

मात्र हाच उड्डाणपूल होऊ नये यासाठी अनेक वर्ष हेच छोटेमिया हे बडेमिया यांच्या मार्गदर्शनाखाली अंधारातून अडचणींचे दगड अनेक वर्ष रचत होते.

शेवटी उत्तरेतून आलेल्या विखे यांनी गाढवाला गोपाळशेठ करीत या मांजराच्या गळ्यात यशस्वीरीत्या घंटा बांधली आहे. आता ही मांजर रोज शहरभर ही घंटा वाजवत फिरत आहे.

दुसऱ्याच पोर हे आपलच असल्याच दररोज बोंबलत सांगत आहे, अशी बोचरी टीका शहराच्या आमदारांवर काळे यांनी केली आहे.

बाह्यवळण रस्त्याच्या कामात काडीचेही योगदान नसतानाही त्याचे श्रेय जगताप यांना देण्याचे काम जरी विखे करीत असले तरी अमृत पाणी योजनेचा वाजलेला बोजवारा, रस्त्यांची झालेली विदारक अवस्था, महानगरपालिकेत चालू असणारी अनागोंदी – भ्रष्टाचार, आपल्या नातेवाईक आणि बगलबच्च्यांना पोसण्यासाठी शहराच्या आमदारांनी जनतेच्या पैशांची केलेली लूट, दरवर्षी पाऊस सुरू झाला की नागरिकांच्या घरांमध्ये घुसणारे गटारांचे घाण पाणी, गायब झालेले ओढे-नाले,

स्ट्रीट लाईट प्रकल्पाची कोट्यवधींची लूट करूनही अंधारात असलेले शहर, अजुनही शहराच्या बससेवा आणि कचरा डेपोचा न सुटलेला प्रश्न, उद्ध्वस्त झालेली एमआयडिसी आणि बाजारपेठ या सगळ्याचे श्रेय भविष्यात जगताप हे विखे यांच्या गळ्यात मारण्याचे काम करणार आहेत.

माञ आमदारांच्या शहराच्या दुरावस्थेच्या या अपत्यांना आपले नाव लागणार नाही याची काळजी घेण्यामध्ये खासदार हे नक्कीच चाणाक्ष आहेत.

त्यामुळे सासरेबुवांनंतर आता आधी जवळ घेत नंतर तशाच पद्धतीने जावयाला २०२४ मध्ये कात्रजचा घाट दाखविण्याचे काम ते नक्कीच यशस्वीरित्या करतील, अशी भविष्यवाणी काळे यांनी केली आहे.

दरम्यान कोण, कोण आमदारांच्या दावणीला आहे यात काँग्रेसला काडीचाही रस नसून शहरामध्ये काँग्रेस कुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नसून आमची बांधिलकी ही नगरकर सर्वसामान्य जनता आणि विकासाशी आहे.

काँग्रेसमध्ये कोणत्या आमदाराचा नाही तर केवळ नामदार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचाच आदेश चालतो हेही सांगायला किरण काळे विसरलेले नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe