Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी देखील निवडणुका काल (दि. १३ मे) पार पडल्या. जवळपास ६२ टक्के मतदान झाले.
हा सामना वाकचौरे – लोखंडे असा रंगेल असे वाटत असतानाच उत्कर्षा रुपवते यांनी वंचित कडून उमेदवारी घेत यात उडी टाकली व पाहता पाहता हा सामना तिरंगी झाला. ही निवडणूक शेवटपर्यंत चुरशीची होती. त्यामुळे नेमके कोण विजयी होणार, असे अंदाज बांधणे बहुतेकांना अवघड झाले आहे.
महाविकास आघाडीची हक्काची मतपेढी आपल्याकडे किती प्रमाणात आपल्याकडे रुपवते वळवतील त्याचा परिणाम या सामन्यावर होऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे.
या निवडणुकीत महायुतीकडून महत्त्वाची भूमिका बजावणारे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात (५७ टक्के), महाविकास आघाडीची धुरा सांभाळणारे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात (५८ टक्के), तर माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेवासे विधानसभा मतदारसंघात (५६ टक्के) मतदान झाले (सायंकाळी सहा वाजता हाती आलेली आकडेवारी) असल्याची माहिती मिळाली आहे.
जनसंपर्कात सातत्य, पवार – ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आदी मुद्दे घेऊन वाकचौरे, तर महायुती सरकारच्या शक्तीच्या जोरावर लोखंडे मैदानात उतरलेले पाहायला मिळाले. तर रुपवते यांनी ‘हे दोघेही निष्क्रिय’ असा दावा करत मैदान गाजवले.
विखे पाटलांचे होम ग्राऊंड असलेला शिर्डी, अकोल्यात आमदार किरण लहामटे व माजी आमदार वैभव पिचड, तर कोपरगावात आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे हे महायुती समर्थक असल्याने शिर्डी, कोपरगाव व अकोल्यातून लोखंडेंना मताधिक्याच्या अपेक्षा आहेत, तर माजी महसूलमंत्री थोरातांचा संगमनेर, आमदार लहू कानडेंचा श्रीरामपूर आणि गडाखांचा नेवासे या तीन मतदारसंघातून वाकचौरेंना अपेक्षा आहेत.
संगमनेर, अकोला, श्रीरामपूर आणि नेवासे या चार मतदारसंघाचा कौल निर्णायक ठरेल. तेथे आम्ही आघाडीवर आहोत, असा दावा वाकचौरे समर्थक करीत आहेत, तर नेवासे आणि संगमनेर वगळता आम्ही अन्यत्र सर्व विधानसभा मतदारसंघात आघाडी घेऊ असा, दावा लोखंडे समर्थक करीत आहे. प्रचारासाठी वेळ कमी मिळाला असला, तरी मतदारांचा प्रतिसाद आणि वंचितचा प्रभाव लक्षात घेता, यावेळी मतदार आपल्या पाठीशी उभे राहतील, असा दावा रूपवते यांनी केला आहे.
कोण होईल विजयी?
तिरंगी सामना झाल्याने विजयाची निश्चिती असणारे उमेदवारही संभ्रमात आल्याचे दिसले. कोण कुणाचे किती मते घेतो, तसेच रुपवते यांनी जरांगे पाटील यांची घेतलेली भेट व त्याच मतदार संघातील काही मातब्बर नेत्यांशी आतून जुळवलेले राजकीय सूत्र किती काम करतात हे सर्व गणिते कोणत्या उमेदवारास विजयी बनवेल हे आता ४ तारखेला समजेल.