अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काका-पुतण्यांची जोडी राजकारणात प्रसिद्ध आहे.
काकांचा हात धरून पुतण्याचे राजकारण चालत असल्याचे सर्वजण मानतात. मात्र, एकदा अजितदादांनी आपल्या काकांसाठी सहा महिन्यांतच पदाचा राजीनामा दिला होता.

ही राजकीय सोय काय होती, कोणाच्या सांगण्यावरून केली, काय व कसे ठरले होते. याचा किस्सा स्वत: अजित पवार यांनीच बुधवारी कोपरगावमध्ये सांगितला.
दिवंगत नेते शंकरराव काळे यांच्यासारख्या नेत्यांचा सहवास कसा लाभला, याबद्दल बोलताना अजितदादांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, मी सहा महिन्यांसाठी खासदार होतो, हे फार थोड्या लोकांना आठवत असेल.
१९९१ मध्ये पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान झाले. त्या निवडणुकीत मी बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झालो होतो. मला खासदार म्हणून केवळ सहा महिनेच काम करण्याची संधी मिळाली.
त्यावेळच्या सरकारने पहिला विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मी राजीनामा द्यायचा असे मला पी. व्ही. नरसिंह राव यांनी सांगितले होते.
माझ्या जागेवर ज्येष्ठ नेते शरद पवार येणार आणि मी राज्यात त्यांच्या जागेवर जायचे, अशी राजकीय खेळी त्यावेळी ठरली होती, हा अनुभव अजितदादांनी सांगितला.
तेव्हापासून शरद पवार देशाच्या राजकारणात तर अजित पवार राज्याच्या राजकारणात सक्रीय झाल्याचे पहायला मिळाले.