अमेरिका बनवतोय सर्वात मोठा अणुबॉम्ब एका क्षणात ३ लाखांहून अधिक लोकांचा बळी घेणार !

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : अमेरिका ‘सुपरन्यूक’ अर्थात आतापर्यंतचा सर्वात विध्वंसक अणुबॉम्ब तयार करत आहे. दुसऱ्या महायुद्धा वेळी जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकलेल्या लिटिल बॉय नामक अणुबॉम्बपेक्षा हा नवा अणुबॉम्ब २४ पट अधिक शक्तिशाली असेल.

बायडेन प्रशासनाच्या मंजुरीनंतर अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉनने नुकतीच या नव्या अणुबॉम्बची घोषणा केली. बी ६१-१३ असे या अणुबॉम्बचे नाव आहे. बी ६१ हे अमेरिकेकडून विकसित करण्यात येणाऱ्या अणुबॉम्बच्या समूहाचे नाव असून, नवा अणुबॉम्ब या समूहातील १३वी आवृत्ती आहे.

हा अणुबॉम्ब रशियाच्या मॉस्को शहरावर टाकला तर काय होईल, याचे एक कल्पनाचित्र पेंटागॉनने जारी केले. त्यानुसार ३६० किलोटन टीएनटी स्फोटक क्षमतेचा हा बॉम्ब एका क्षणात ३ लाखांहून अधिक लोकांचा बळी घेईल आणि ९ लाखांहून अधिक लोक जखमी होतील.

हा बॉम्ब फुटल्यानंतर स्फोटाच्या ठिकाणापासून सुमारे एक किमीच्या त्रिज्येच्या परिसरातील प्रत्येक सजीव, निर्जीव वस्तू आगीमुळे भस्मसात होईल, तर दोन किमी त्रिज्येच्या परिसरातील इमारती जमीनदोस्त होतील.

स्फोटाच्या चार किमी त्रिज्येच्या परिसरातील प्रत्येक सजीव उच्च पातळीच्या किरणोत्सर्गामुळे एका महिन्याच्या आत मृत्युमुखी पडेल. जे वाचतील त्यांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागेल. बी६१ श्रेणीतील अणुबॉम्ब हे ग्रॅव्हीटी बॉम्ब आहेत.

म्हणजेच या बॉम्बमध्ये लेझर गाइडेड बॉम्बप्रमाणे लक्ष्य निर्धारित नसते, तर विमानातून ते गुरुत्वाकर्षण शक्तीने खाली पडतात; परंतु या नव्या आवृत्तीत बसवण्यात येणाऱ्या टेल किटमुळे त्याची लक्ष्यभेदाची अचूकता वाढते.

हिरोशिमावरील हल्ल्यात वापरण्यात आलेल्या लिटिल बॉय नामक अणुबॉम्बचे वजन ४४०० किलो इतके होते, तर बी ६१ – १३ हा नवा अणुबॉम्ब अवघा ३७३ किलो वजनी आहे. लिटिल बॉयच्या तुलनेत नव्या सुपरन्यूकचा आकारदेखील निम्मा आहे.

लिटिल बॉयच्या स्फोटातून १६ हजार टन टीएनटी इतकी स्फोटक शक्ती निर्माण झाली होती. तर नव्या अणुबॉम्बची स्फोटक क्षमता तब्बल ३ लाख ६० हजार टन आहे. हिरोशिमावरील हल्ल्यात सुमारे १ लाख ३५ हजार लोक मृत्यूमुखी पडले होते.

नव्या अणुबॉम्बमुळे बळींचा आकडा १० लाखांपर्यंत असू शकतो. हा बॉम्ब हिरोशिमापेक्षा १५ पट मोठा भूभाग उद्ध्वस्त करेल, असा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe