वैताग संपणार, कोरोनाची कॉलर ट्यून कायमची बंद होणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :-  कोणालाही फोन केला की, रिंग वाजण्याअगोदर ऐकू येणारी कोरोनासंबंधी प्रबोधन करणारी कॉलर ट्यून आता कायमची बंद होणार आहे. केंद्र सरकारमधील सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.

एक एप्रिलपासून देशातील बहुतांश निर्बंध शिथील केले जात असताना या कॉलर ट्यूनच्या त्रासातूनही नागरिकांची सुटका करण्यात येणार आहे.

सुरवातीच्या काळात सुपर स्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ही कॉलर ट्यून ऐकविली जात होती. तेव्हा लस उलब्ध नव्हती. त्यामुळे इतर प्रतिबंधात्मक उपायासंबंधीच्या सूचना बच्चन देत होते.

मास्क आणि दो गज की दूरी वगैरे संदेश यातून दिला होता. मात्र, काही काळात स्वत: बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांनाच कोरोनाची लागण झाली. त्यातच लोकांना महत्वाच्या कामासाठी फोन करताना आधी ही ट्यून ऐकावी लागत होती.

त्यामुळे याविरोधात कोर्टात याचिका दाखल झाल्या होत्या. कोर्टानेही सरकारला विविध निर्देश दिले. त्यानंतर कोरोनावरील लस आली. त्यावर सरकारने ही ट्यूनही बदलली.

व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट जसलीन भल्ला यांच्या आवाज संदेश देण्यात येऊ लागला. लस घेण्याचे आवाहन त्यात केले जात होते. मात्र, प्रत्यक्षात लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे लोक यासंबंधीही तक्रारी करू लागले.

त्यात थोडी सुधारणा करून ही ट्यून सुरूच ठेवण्यात आली आहे. आता मात्र, ही ट्यून कायमची बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. याला केंद्र सरकारमधील अधिकाऱ्यांकडूनही दुजोरा मिळत आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe