रस्त्यावर टाकलेल्या कचवर रिक्षाचे चाक घसरून झालेल्या अपघातात रिक्षा चालक प्रशांत पोपट कांबळे (वय 36 रा. आरणगाव ता. नगर) याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. (Ahmednagar News)
नगर-दौंड रस्त्यावर आरणगाव शिवारात हा अपघात झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात रस्त्यावर कच टाकणारा
दत्तात्रय शांतराम देवगावकर (रा. आरणगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रशांत कांबळे यांची पत्नी छाया प्रशांत कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.
रात्रीच्या वेळी प्रशांत कांबळे हे त्यांच्याकडील रिक्षा घेऊन नगर-दौंड रस्त्याने जात होते. दत्तात्रय देवगावकर याने त्याच्या बंगल्याच्या कामासाठी कच आणलेली होती.
ती कच त्याने रस्त्यावर टाकली आहे. या कचवरून रिक्षाचे एक चाक गेल्याने रिक्षा रस्त्याच्या डिव्हायडरला जावून धडकुन पलटी झाली.
यामुळे प्रशांत यांच्या डोक्याला मार लागून ते मयत झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक एस. बी. बडे करीत आहेत.