नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून देशात आणि राज्यात पेट्रोल (Petrol) डिझेलचे (Disel) भाव गगनाला भिडले आहेत. याचे परिणाम सर्वसामान्य लोकांना सहन करावे लागत आहेत. मात्र PM मोदींनी (PM Modi) महाराष्ट्रासहित अन्य राज्यांना इंधनावरील व्हॅट (VAT) कमी करण्याची विनंती केली आहे.
गुरुवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र सरकार (Maharashtra Goverment) मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि इंधनाच्या दरांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. एका ज्येष्ठ मंत्र्याने बुधवारी ही माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत डिजिटल बैठकीदरम्यान, त्यांना मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करण्याचे आवाहन केले होते, विशेषत: विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या अनेक राज्यांमध्ये इंधनाच्या चढ्या किमतींचा संदर्भ देत.
पेट्रोलवरील व्हॅटमध्ये महाराष्ट्राचा वाटा केंद्राच्या तुलनेत किंचित जास्त आहे, आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाईल, असे ज्येष्ठ मंत्री म्हणाले.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) आधी बुधवारी होणार होती, मात्र मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबतची बैठक असल्याने ती गुरुवारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
डिजिटल बैठकीनंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या कार्यालयाने (सीएमओ) एक निवेदन जारी केले ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या इंधनावर आणि प्रामुख्याने पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणार्या कराचा तपशील देण्यात आला आहे.
सीएमओने सांगितले की, मुंबईत विकल्या जाणाऱ्या डिझेलवर केंद्राला २४.३८ रुपये, तर राज्याला २२.३७ रुपये मिळतात. मुंबईत विकल्या जाणाऱ्या एका लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्याचा वाटा अनुक्रमे 31.58 रुपये आणि 32.55 रुपये आहे.
पीएम मोदींनी या राज्यांची नावे घेतली
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत पीएम मोदींनी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, तामिळनाडू या राज्यांची नावे घेतली आणि त्यांनी काही ना काही कारणाने केंद्र सरकारचे म्हणणे ऐकले नाही, असे सांगितले. म्हणजे त्यांनी व्हॅट कमी केला नाही, ज्याचा थेट बोजा सर्वसामान्यांवर पडत आहे.