अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Ahmednagar Politics : अहमदनगरचे पालकमंत्री बदलले जाणार का? आणि जिल्हा रुग्णालयातील आगीचा चौकशी अहवाल कधी जाहीर होणार? हे दोन प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
यावरूनच जिल्हाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रकारांनी घेरले. मात्र, त्यांनाही या दोन्ही प्रश्नांची उत्तरे ठामपणे देता आली नाहीत.

आगीच्या अहवालासंबंधीच्या प्रश्नाचे उत्तर पुढील पत्रकार परिषदेच्यावेळी आपण नक्की देऊ, असे ते म्हणाले. त्यावर तुम्ही पुढीलवेळी पालकमंत्री असाल का? असे पत्रकारांनी विचारले असता मी नसलो तरी जो कोणी पालकमंत्री असेल, त्याला मी याचे उत्तर द्यायला सांगेल, असे आश्वासनच मुश्रीफ यांनी देऊन टाकले.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पालकमंत्री नगरला आले होते. त्यामुळे पालकमंत्री बदल आणि आग या दोन्ही विषयांना पत्रकारांनी हात घातला. नोव्हेंबर २०२१ मध्ये जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागली होती.
त्याची चौकशी झाली. मात्र, अद्याप अहवाल जाहीर झाला नाही. यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्याचे उत्तर मुश्रीफ यांच्याकडे नव्हते.
हा मुद्दा आरोग्य विभागाशी संबंधित असल्याने माहिती नसल्याचे ते म्हणाले. त्यावर पालकमंत्री म्हणून संबंधित विभागाने तुम्हाला माहिती दिली पाहिजे, असे पत्रकारांनी म्हणतातच पुढील पत्रकार परिषदेच्यावेळी मी नक्की माहिती देईन, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार पिच्छा सोडायला तयार नव्हते. तोपर्यंत तुम्ही पालकमंत्री राहणार का? असा थेट प्रश्नच विचारण्यात आला. त्यावर मुश्रीफ म्हणाले, नगरचे पालकमंत्रीपद नको अशी माझी भावना आहे.
मी ती पक्षाकडे व्यक्त केली आहे. नगर मला दूर पडते. त्यामुळे पुरेसा न्याय देता येत नाही. मात्र, त्यावर काय निर्णय घ्यायचा, कोणाला पालकमंत्री करायचे हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.
मात्र, जो कोणी पालकमंत्री येईल, त्याला मी या प्रश्नाचे उत्तर द्यायला सांगेल, असे मुश्रीफ म्हणाले. पालकंमत्री पदाचा बदल करायचा ठरलाच तर सध्याच्या मंत्र्यांपैकीच कोणाकडे जबाबदारी दिली जाईल, नवीन कोणाला मंत्री केले जाण्याची शक्यता नाही, असेही सूचक विधान त्यांनी केले.