‘या’ रेल्वे स्टेशनवर हमालांची धमाल…बॅगा घेऊन जाण्यासाठी द्यावे लागतात ४०० ते ५०० रुपये

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  पुणे स्थानकावर एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावरून बॅगा घेऊन जाण्यासाठी हमालांना ४०० ते ५०० रुपये भाडे द्यावे लागत आहे. व्हीलचेअरवरुन दिव्यांग अथवा ज्येष्ठांना घेऊन जाण्यासाठी ६०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहेत.

असा मनमानी कारभार सध्या पुणे रेल्वे स्थानकावर सुरु आहे. दुर्दैवाने प्रवाशांना सहन कराव्या लागणाऱ्या मनमानीविरोधात रेल्वे प्रशासन कोणताही हस्तक्षेप करीत नाही.

मात्र तरीही काही प्रवासी लेखी तक्रारीही नोंदवू लागले आहेत. मात्र त्याचीही दखल रेल्वे प्रशासनाकडून अजून घेतली गेलेली नाही. कोरोनाचा कहर कमी झाल्याने आता पुणे रेल्वे स्थानकावरून रोज जवळपास २०० गाड्या ये-जा करतात. स्थानकावरच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या लाखाच्या घरात आहे.

प्रवाशांच्या या संख्येच्या तुलनेत हमालांची संख्यादेखील पुरेशी आहे. जवळपास १२० परवानाधारक हमाल पुणे स्थानकावर काम करतात. या हमालांनी गेल्या काही दिवसात विविध कारणे सांगत अघोषित भाडेवाढ केली आहे.

प्रवाशांच्या बॅगा फलाट एकवरून तीनवर घेऊन जाण्यासाठी ३०० रुपये आणि चार व पाचवर जाण्यासाठी ४०० रुपये घेतले जातात. सर्वात जास्त अडवणूक ही व्हीलचेअरवरून ये-जा करणाऱ्या दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांची होते.

जास्त हमाल लागतात असे सांगून प्रवाशाची आर्थिक स्थिती व गरज लक्षात घेऊन 800 ते हजार रुपये उकळले जातात. या लुटीला विरोध केला तर दमदाटी, दादागिरी, भांडणे केली जातात.

दरम्यान हमालांची दादागिरी, मनमानी रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन स्वत:हून पुढाकार का घेत नाही? असा संतप्त सवाल प्रवाशी विचारू लागले आहे. तसेच यामध्ये काही आर्थिक संबंध जोडले गेले आहे का? असा संशय आता प्रवाश्यांकडून व्यक्त केला जाऊ लागला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe