१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : राजमाता जिजाऊसाहेब भोसले व स्वामी विवेकानंद जयंती यानिमित्ताने आयोजित जिजाऊ महोत्सव २०२५ मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण केले जाणार आहे. केडगाव येथील लिंक रोडवरील नियोजित अपेक्स स्कूल संकुलामध्ये रविवारी (दि. १२ जानेवारी) युवा दिनानिमित्त सकाळी १० वाजता आयोजित सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रण समितीचे अध्यक्ष ऐड. संतोष गायकवाड यांनी केले आहे.
सदर कार्यक्रमात यशोदा यादवराव लंके यांना जिजाऊ आदर्श माता, डॉ. प्रफुल्ल गाडगे (सीईओ, बायोमी टेक्नॉलॉजीज प्रा. लि., दैठणे गुंजाळ, ता. पारनेर) यांना युवा उद्योजक आणि कर्जतमधील लेखिका स्वाती पाटील यांना युवा कवयित्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे कार्यवाह लेखक सचिन मोहन चोभे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार असून आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते (पोलिस अधीक्षक, शस्त्र निरीक्षक शाखा, पुणे) यांच्यासह माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक राजेंद्र शिंदे, लेखक नितीन थोरात व देवा झिंजाड हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष उद्योजक व स्व. ठकाजी सातपुते चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष किसन सातपुते हे आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजन समितीचे कार्याध्यक्ष महादेव गवळी यांनी केले आहे.