Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संजय राऊत यांना जामीन मिळताच राज्यात अनेक ठिकाणी जल्लोष व्यक्त करण्यात आला आहे.
संजय राऊत यांना जामीन मंजूर करताच कोर्टामध्ये लोकांनी टाळ्या वाजवल्या मात्र या लोकांच्या कृत्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये फटाके वाजवत, पेढे वाटत जल्लोष व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांचे कट्टर समर्थक तुषार रसाळ यांच्या माध्यमातून ठाण्यातील तीन हात नाका येथे मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला आहे. येथील रसाळ आणि राऊत कार्यकर्त्यांनी पेढे वाटत आनंद साजरा केला आहे.
संजय राऊत यांच्या जामिनाची कागदपत्रे आज जेलमध्ये पोहोचले तर आजच संजय राऊत यांची सुटका होऊ शकते. भांडुप येथील राऊतांच्या मैत्री निवासस्थानी संजय राऊत यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
संजय राऊत यांची जेलमधून सुटका होणार असल्याने खऱ्या अर्थाने कुटुंबीयांची दिवाळी आता साजरी होणार आहे. संजय राऊत यांना भेटण्यासाठी अनेक कार्यकर्त्ये तसेच पदाधिकाऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.