Balasaheb Thorat: ‘त्या’ प्रकरणात बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले सावध; म्हणाले,त्यांची जागा.. 

Ahmednagarlive24 office
Published:
Balasaheb Thorat warned the Congress workers

 Balasaheb Thorat:  राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी नंतर आता प्रत्येक पक्षाने दक्षता घ्यायला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) 40 पेक्षा जास्त आमदार फोडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष दक्षता घेत आहे.

यातच काँग्रेस (Congress) पक्षाचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी देखील संगमनेर तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना सावधान करत महत्वाचा सल्ला दिला आहे. आगामी काळासाठी आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. आपल्यामध्ये मनभेद करणारे काही येतील. त्यांना वेळीच त्यांची जागा दाखवा आणि काँगेसची एकजूट दाखवून द्या, असं आवाहन थोरात यांनी केले

संगमनेरमध्ये आयोजित एका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बाळासाहेब थोरात बोलत होते. सत्तांतरानंतर थोरात यांचा हा पहिलाच मेळावा होता. त्यामुळे या मेळाव्यात थोरात काय बोलणार याकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागून होते.

यावेळी थोरात म्हणाले की जनतेचे प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे सातत्याने विविध मंत्रिपदांवर काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक मंत्रिपदाला न्याय दिला. संगमनेर तालुक्याचा व जिल्ह्याचा लौकिक राज्यात वाढेल असं काम केलं.

महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्री पदाच्या काळात ऑनलाईन सातबारा याचबरोबर तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने मोठा निधी मिळवला. सत्तेचा उपयोग हा गोरगरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी केला आहे. राज्यात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहोत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरळ व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अनेक वेळा विश्वास टाकला. यातून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी मोठे निर्णय घेता आले. 

थोरात पुढे म्हणाले कि काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना पक्षाला सन्मान मिळून देत महाविकास आघाडी सरकार राज्यात अस्तित्वात आणली. या सरकारच्या काळात करोना, चक्रीवादळ, अतिवृष्टी यासारख्या मोठ्या संकटातूनही शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफीसह महाविकास आघाडी सरकारने पायाभूत विकासाचे अत्यंत चांगले निर्णय घेतले. सत्ता येते आणि जाते, पण जनतेची कामे करणे महत्त्वाचे असते.

आगामी काळामध्ये प्रगतीपथावर असलेल्या सर्व सहकारी संस्थांची गौरवास्पद वाटचाल अशीच सुरू ठेवून सर्व निवडणुका एकजुटीने एकत्रित लढून मोठे यश संपादन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित रहावे आणि आपल्यामध्ये मनभेद करणारे काही येतील, त्यांना वेळीच त्यांची जागा दाखवा. जिल्ह्यातही काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने लढेल आणि जिंकेल याकरता आपण सर्वांनी कटिबद्ध राहावे, असं आवाहनही थोरात यांनी केलं आहे. 

यावेळी संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी यांसह अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe