कोल्हेनीं साकारलेल्या ‘नथुराम’ भूमिकेवर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांचा ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट 30 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला.

पण, हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे. कारण या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. गोडसेची भूमिका करण्याच्या त्यांच्या निर्णयावरून सध्या राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाला आहे. काही नेत्यांनी कोल्हे यांच्या या निर्णयावर टीका केली आहे तर काहींनी संयमी भूमिका घेतली आहे.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही याबद्दल आपले मत मांडले आहे. या संदर्भात थोरात एका वृत्तवाहिणीसोबत बोलताना म्हणाले की, कलाकार हा कलाकार असतो. त्याच्या कलेला बंधन असू नये. मात्र, एखाद्या भूमिकेतून चुकीच्या विचारांचं उदात्तीकरण होणार नाही याची काळजी घेतली जायला हवी.

कोल्हे यांच्या भूमिकेतून नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण होऊ नये, असे थोरात म्हणाले. ज्यांच्या नेतृत्वामुळं देशाला स्वातंत्र्य मिळाले, ज्यांच्या विचारांमुळे देश आज प्रगती करतो आहे, त्यांच्या विरोधात ही भूमिका नसावी, अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हे यांच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘अमोल कोल्हे हे कलाकार म्हणून ही भूमिका करत असले तरी त्यात नथुराम गोडसे याचं समर्थन आहे. कलाकाराचा वेष घेऊन कोणी गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही.

त्यामुळं या चित्रपटाला आम्ही विरोध करणार, अशी भूमिका आव्हाड यांनी घेतली आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ नावाचा हिंदी चित्रपट येत्या महिनाअखेरीस ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे ट्रेलर आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे.

‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटातील नथुराम गोडसेच्या भूमिकेबाबत खासदार कोल्हे म्हणाले की, या चित्रपटाचे चित्रीकरण २०१७ मध्ये झाले होते. त्यावेळी मी राजकारणात नव्हतो, तसेच कोणत्याही मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत नव्हतो. कलाकार एखादी भूमिका करतो म्हणजे तो शंभर टक्के त्या विचारधारेशी सहमत असतोच, असे नाही.

काही भूमिका आपण संबंधित विचारधारेशी सहमत नसतानाही करत असतो. एक कलाकार म्हणून भूमिका करणे आणि राजकारणाशी संबंध जोडणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत.

एक व्यक्ती म्हणून मला वैचारिक भूमिका आहे. तो चित्रपट मी चार ते पाच वर्षांपूर्वी केलेला आहे, त्यामुळे त्यात काय आहे, ते मलाही ३० तारखेलाच कळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe