अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही महिन्यापूर्वीच सोयाबीनला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांमध्ये एक उत्साहाचे व समाधानाचे वातावरण होते. मात्र अवघ्या काही दिवसांमध्येच भाव मोठ्या दराने घसरल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
सोयाबीनला चांगला भाव मिळू लागल्याने, शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरणी केली.
मात्र, सध्या अवघा चार ते पाच हजार रुपये क्विंटलचा भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदाच्या हंगामात वेळेवर पाऊस पडला.
त्यातच सोयाबीनला विक्रमी दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळू लागल्याने, मोठ्या प्रमाणावर शेतकरी या पिकाकडे वळले. जिल्ह्यात तब्बल ९९ हजार ४१७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला.
यंदा शेतकऱ्यांनी बाजरी, कपाशी या पिकांच्या तुलनेत सोयाबीनला प्राधान्य दिले, तसेच यंदा हवामानाच्या लहरीपणामुळे उत्पादनातही कमालीची घट झाली. आता दरही कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान अनेक संकटाना मात देत पिकांना जपणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान सोयाबीनचे घसरते दर पाहून पिकवलेला माल विक्रीस न्यायचा कि नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम