दुष्काळाचे सावट ! जगण्यासाठी बळीराजाची धडपड, कुटुंबाचा खर्च भागवणे देखील अवघड

Marathi News

Marathi News : पावसाने पाठ फिरवल्याने भीषण शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. खरीप हंगाम वाया जाणार असून, रब्बी हंगामावर दुष्काळाचे सावट कायम आहे. त्यामुळे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, विहिरी, बंधारे कोरडे ठाक पडले आहेत. खरीप पिकांची दुर्दशा झालेली पहावयास मिळते. संपूर्ण शेवगाव तालुका पाऊस नसल्याने दुष्काळाच्या छायेत असून, अजूनही बळीराजा मात्र चातकाप्रमाणे पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

खरीप हंगामातील कपाशी बाजरी, मूग, सोयाबीन तूर पिकांची पावसाअभावी पिके सुकून माना टाकल्या आहेत यावर्षी सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने थोड्याफार पावसावर शेतक-यांनी पेरण्या केल्या. त्यातच पेरणीनंतरदेखील पावसाने दडी मारल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. काही भागात पिके हिरवी दिसत असली तरी पाण्यासाठी ताणल्याने उत्पन्नात मोठी घट होणार आहे तर काही ठिकाणी पिके पावसा अभावी कोमेजून जात आहेत. खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे.

पावसाळ्याचे तीन महिने उलटली तरी पावसाने पाठ फिरवल्याने रब्बी हंगामावरदेखील दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. तालुक्यातील बहुतांशी भागातील विहिरी, बंधारे, कूपनलिका कोरडयाठाक पडल्या आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार आहे त्याचप्रमाणे पशुधन वाचविण्याचे मोठे संकट दुग्ध व्यावसायिकांसमोर उभे ठाकणार आहे. चाऱ्याचा प्रश्नदेखील गंभीर होणार असून, पशुधन कसे जागवावे, या विवंचनेत पशुपालक सध्या सापडलेला आहे.

शेवगाव तालुक्यातील बहुतांश गावे हे कमी पर्जन्यमानाची गावे म्हणून ओळखले जातात; परंतु गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील पर्जन्यमानाचे प्रमाण चांगले राहिलेले आहे. मागील वर्षी तर अतिवृष्टीने हाहाकार घातला होता. तालुक्यात परतीचा मान्सून चांगल्या प्रमाणात कोसळतो. आता परतीच्या मान्सूनवर शेतकरी आशा लावून बसला आहे. मागील वर्षी अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ वातावरण, धुके, अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. तर चालू वर्षी वरुणराजाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची निराशा केली आहे.

रिमझिम पावसावरच पिके तग धरून होती; परंतु मोठा व चांगला पाऊस नसल्याने पावसाने हिरमोड केल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. पाण्याअभावी पिके करपली जात असून, उत्पन्नाला मोठा फटका बसणार हे निश्चित असून, खर्च तर मोठ्या प्रमाणात होऊन हातात काहीच शिल्लक राहणार नाही हे तितकेच खरे.

खिशात पैसा नाही… काळ्या आईच्या उदरातून मिळणारे उत्पन्न नाही… विहिरी, कोरड्या ठाक… पाण्याची दुर्भिक्ष… चाऱ्याचा उद्भवलेला प्रश्न, असे विदारक चित्र सध्या ग्रामीण भागात प्रकर्षाने पहावयास मिळत आहे. तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून,बळीराजा मात्र परतीचा मान्सून चांगला बरसेल, या आशेवर आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

जगण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू

पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर भीषण संकट उभे राहिले आहे. पाणी व चाऱ्या वाचून पशुधन जगवणे मुश्किल झाले आहे. तर दुसरीकडे गेल्यावर्षी तसेच सद्यस्थिती पाहता शेतीतून उत्पन्न मिळणार नाही, त्यामुळे कुटुंबाचा खर्च भागवणेदेखील अवघड झाले आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने तर चालू वर्षी दुष्काळजन्य परिस्थितीने बळीराजा खचून गेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe