मानवाचा श्वास आणि हृदयाची धडधड कायमची थांबल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार जेथे करण्यात येतात त्या ठिकाणाला स्मशानभूमी नावाने ओळखतात, हे आपणाला माहीत आहे.
पण चक्क जुन्या झालेली भंगार विमानांचेही एका ठिकाणी दफन करण्यात येते, हे वाचून आश्चर्याचा धक्का बसला ना! पण ही काही चेष्टा किंवा गंमत नाही, तर वस्तुस्थिती आहे. अमेरिकेतील अॅरिझोन या ठिकाणी असलेले डेविसमोथान एअरबेस हे ठिकाण विमानांची जगातील सर्वात मोठी स्मशानभूमी म्हणून ओळखले जात आहे.
या ठिकाणी हजारोंच्या संख्येने जुनी आणि अकार्यक्षम झालेली हजारो विमाने अक्षरशः पडून आहेत. या विमानांच्या पुनर्वापरामध्ये येणारे काही पार्ट काढून घेतल्यानंतर राहिलेले सांगाडे गाडले जातात.
साधारणपणे दुसऱ्या महायुद्धापासून ते आजअखेरपर्यंत सुमारे साडेचार हजारांहून अधिक विमाने जी वापरण्यास योग्य नाहीत ती येथे पडून आहेत. त्यामुळे हे ठिकाण म्हणजे जणू विमानांची दफनभूमी म्हणून जगभरात प्रसिद्ध होत आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने निपचित पडलेली विमाने पाहण्यासाठी जगभरातील पर्यटकांची पसंती दिवसेंदिवस वाढत होती, पण सुरक्षेच्या कारणांमुळे आता हे ठिकाण पर्यटकांसाठी ‘बॅन’ करण्यात आले आहे.
या ठिकाणी रात्रंदिवस कडेकोट पहारा ठेवण्यासाठी सुमारे पाचशेहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे येथे कोणीही फिरकू शकत नाही. या ठिकाणी असलेल्या काही विमानांचे वापरण्यास योग्य असलेले सुट्टे भाग ‘नासा’ने काही बंद असलेल्या विमानांना पुन्हा वापरून ती हवाई उड्डाणासाठी तयार केलेली आहेत.