Snake News : साप हा भीतीदायक सरपटणारा प्राणी. पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना वाढतात. सर्प दंश झाल्याने दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. यामुळे साप फक्त दिसला तरी अनेकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. पण देशात आढळणारे बहुतांशी साप बिनविषारी आहेत. मात्र तरीही साप चावल्याने अनेकांचा मृत्यू होतो. यामुळे आपण कोणताही साप दिसला तरी घाबरतो. पण ही भीती काही गैरसमजांमुळे निर्माण झाली आहे. सर्व साप विषारी असतात हा त्यातील सर्वात मोठा गैरसमज असल्याचे समजते. प्रत्यक्षात भारतात आढळणाऱ्या सापांच्या हजारो प्रजातींपैकी फक्त काही मोजक्या प्रजातीच विषारी आहेत. विषारी जातीमध्ये फुरसे, मण्यार, घोणस आणि नाग (इंडियन कोब्रा) या चार प्रजातीचा समावेश होतो. या जाती आपल्याकडे प्रामुख्याने दिसतात.
या जाती प्रचंड विषारी असून त्यांना बिग फोर असे संबोधले जाते. अनेकदा साप घरात घुसण्याच्या घटना घडतात. अशा वेळी घाबरून जाऊ नये किंवा सापांना मारण्याचा प्रयत्न करू नये. सर्पमित्रांना त्वरित माहिती दिल्यास ते साप सुरक्षितरीत्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडतात. लक्षात ठेवा साप कधीही स्वतःहून हल्ला करत नाही. तो फक्त धोका जाणवल्यासच हल्ला करतो, कारण त्याचा स्वभाव मुळात लाजाळू असतो.

साप घरात घुसण्याची अनेक कारणे असतात. त्यातील प्रमुख कारण म्हणजे उंदरांची उपस्थिती. शिकारीच्या शोधात साप घरात प्रवेश करतात. त्यामुळे घरात किंवा आसपास उंदरांची बिळे असल्यास ती तातडीने बंद करावीत. तसेच परिसरातील गवत वाढू देऊ नये, कारण गवत हे सापांचे लपण्याचे सुरक्षित ठिकाण ठरते. स्वच्छ आणि खुला परिसर सापांपासून संरक्षण देतो.
याशिवाय काही वनस्पतींमुळे साप त्या परिसराकडे आकर्षित होतात. विशेषतः चंदन आणि केवडा या झाडांच्या आसपास सापांचा वावर जास्त आढळतो. चंदनाचे झाड घरात क्वचितच लावले जाते, पण केवड्याचे झाड अनेक घरांच्या आवारात असते. तज्ज्ञांच्या मते केवड्याच्या झाडाखाली अनेकदा साप आढळतात, त्यामुळे अशा झाडांची निगा राखताना काळजी घेणे आवश्यक आहे.
पर्यावरणाच्या साखळीत सापांचा महत्त्वाचा वाटा आहे. ते उंदरांसारख्या कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे साप दिसल्यास घाबरण्यापेक्षा जागरूक राहा आणि सर्पमित्रांची मदत घ्या असा सल्ला दिला जातो कारण साप तुमचा शत्रू नव्हे, तर पर्यावरणाचा एक खास मित्र आहे. सापांचे संवर्धन होणे हे फार गरजेचे आहे.











