संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता बाळगा, टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता बाळगा. टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांचे मुंबईहून वाहनाने पंढरपुरात आगमन झाले.

लांबचा प्रवास असूनही मुख्यमंत्र्यांनी विश्रांती न घेता शासकीय विश्रामगृह येथे पोहचताच, बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महापालिका आयुक्त पि.शिवशंकर,

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेआदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत.

या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे, यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून कोरोनाचा मुकाबला करूया,. मुख्यमंत्री म्हणाले, प्रशासन, आरोग्य विभागाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उल्लेखनीय काम केले आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता बाळगा. टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या.

नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या. ऑगस्ट, सप्टेंबरपासूनज लसीचा पुरवठा सुरळित होईल. ऑक्सिजनची उपलब्धता आणि लागणारी गरज याचे योग्य नियोजन करा. ऑक्सिजनचा अधिक साठा करण्यावर भर द्यावा. अर्थचक्र थांबू नये म्हणून कोरोनाचे नियम पाळून उद्योग-धंदे सुरू आहेत.

कामगारांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या तसेच खाजगी दवाखान्यातून लस घेण्यास परवानगी दिली असल्याने उद्योगांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर अधिकाधिक भर द्यावा. कोविड झालेल्या रूग्णांच्या लसीकरणाचे योग्य नियोजन करा.

म्युकरमायकोसिसबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, औषधाचा पुरेसा साठा, इंजेक्शनची कमतरता पडणार नाही, याचीही काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शास्त्रज्ञांनी लहान मुलांना धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे. याबाबत त्यांच्या उपचारासाठी आवश्यक हॉस्पिटल ची निर्मिती, त्यांच्यासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा उपलब्ध करून ठेवा , अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe