कुटुंबियासमोर मोठे संकट ! विजेच्या धक्क्याने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव शिवारात विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी रविकिरण बाळासाहेब वाघ (वय 33) यांचा पॅनल बोर्डला चिकटून मृत्यू झाला.

महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे या शेतकर्‍याला जीव गमवावा लागला असून या गरीब शेतकर्‍याच्या कुटुंबियाला मदत करण्याची मागणी होत आहे.

निपाणी येथील अल्पभूधारक शेतकरी रविकिरण वाघ हे आपल्या स्वःतच्या मालकीच्या गट नं. 145/3 मध्ये पाऊस झाल्याने मोटारीला बसवलेला अ‍ॅटो बंद करण्यासाठी सकाळी गेले

असता पॅनल बोर्डमध्येच विद्युत प्रवाह उतरल्याने पॅनल बोर्ड उघडताच त्यांना विजेचा धक्का लागल्याने रविकिरण हे जागेवर कोसळले.

बराच वेळ झाला तरी आपले पती घरी न परतल्याने पत्नी कोमल पतीला पाहण्यासाठी विहिरीकडे गेली असता तिला पती रविकिरण हे पॅनल बोर्ड जवळ पडलेल्या अवस्थेत आढळल्याने तिने आरडा ओरड केली.

हे ऐकून शेजारी शेतातील नातेवाईक धावत आले. रविकिरण वाघ यांना श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 1 लहान मुलगी, भाऊ, 2 बहिणी असा परिवार आहे.

मयत रविकिरण घरामध्ये एकमेव कमावता होता. त्यांच्या मृत्युमुळे कुटुंबियासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe