Voter Card Update: देशातील तरुण मतदारांसाठी एक मोठी बातमी आहे. आता मतदार ओळखपत्र (voter identity card) मिळवण्यासाठी 18 वर्षे वयाची गरज नसून, वयाच्या 17 व्या वर्षी तुम्ही मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकाल. भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) ही मोठी घोषणा करत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली नसावी –

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, 1 जानेवारी 2023 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे लोकही मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. आता तरुण 18 वर्षांचा झाल्यावरच अर्ज करू शकतो असे नाही. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे (Anoop Chandra Pandey) यांनी सर्व राज्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नवीन नियम आणि सूचना जारी केल्या आहेत.
वर्षातून 3 वेळा अर्ज करू शकता –
निवडणूक आयोगाने (ECI) गुरुवारी आपल्या नवीन सूचनांमध्ये म्हटले आहे की, नागरिक आता त्यांची नावे मतदार यादीत अगोदर जोडण्यासाठी अर्ज करू शकतील. यामुळे आता तरुणांना मतदार ओळखपत्रासाठी वर्षातून तीनदा अर्ज करता येणार आहे. 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करता येईल, असे सांगण्यात आले.
सर्व राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत –
निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या सीईओ (CEO), ईआरओ, इरोजना तंत्रज्ञान सक्षम उपायांवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी निवडणूक आयोग नवीन नोंदणी फॉर्म आणणार आहे, ज्यासाठी तुम्हाला आधार कार्डची (aadhar card) माहिती द्यावी लागेल. तसेच ते बंधनकारक नाही आणि अर्जदार स्वेच्छेने ही माहिती देऊ शकतात.
1 ऑगस्टपासून महाराष्ट्रात मोहीम –
पॅन आणि आधार लिंक (PAN and Aadhaar link) केल्यानंतर आता मतदार ओळखपत्राची पाळी आहे. आता मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केले जाईल. यासाठी महाराष्ट्रात 1 ऑगस्टपासून मोहीम सुरू होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती दिली आहे. मतदारांची ओळख पटविण्यासाठी आणि मतदार यादीतील नक्कल रोखण्यासाठी हे केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.