मोठी बातमी : राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस ! हवामान खात्याकडून अलर्ट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  काही दिवसांपासून राज्यात मान्सूनसाठी अनुकूल हवामान नसल्यानं पावसानं दडी मारली आहे. पुढील आणखी तीन चार दिवस राज्यात उघडीप राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र राज्यात मान्सूनची वापसी होण्याची शक्यता आहे.

चालू आठवड्यात विकेंडनंतर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.राज्यातील जवळपास 16 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विकेंडनंतर सोमवारी, 16 ऑगस्ट रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोदिंया या जिल्ह्यांत विजांच्या कडकडासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे.

संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर याच दिवशी पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना या चार जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

राज्यात मंगळवारी देखील आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवड्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारी देखील पुण्यासह एकूण चौदा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट दिला आहे. सध्या बिहार आणि आसपासच्या परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे आंध्र प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी दक्षिण मराठवाड्यात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

काल पुणे शहरासाठी ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. आजही मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच पुणे जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe