मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातवासोबतचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केले होते. त्याचाच संदर्भ देत आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
‘उद्धव ठाकरे अडीच वर्षे मंत्रालयामध्ये गेले नव्हते, याबद्दल एकनाथ खडसे काही बोलले नाहीत. एकनाथ शिंदे यांनी नातवाला वेळ देऊन कौटुंबिक जबाबदारी पार पडली. खासगी आयुष्याशी निगडीत टीका ही परंपरेला धरुन नाही, असा टोलाही मुनगंटीवार यांनी खडसेंना लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या संदर्भात कौटुंबिक घटनेच्या आधारे भाष्य करणं हे राजकीय दृष्टीकोनातून परंपरेच्या विरुद्ध आहे. एखाद्या आईने मुलासाठी स्वयंपाक केला ही बातमी होत नाही. मुख्यमंत्री मंत्रालयात गेले ही बातमी होता कामा नये. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रंजल्या गांजल्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मुख्यमंत्री हे पद स्वीकारतात. मात्र दुर्देवाने महाराष्ट्रातील मुख्यमंत्री जसं काही त्यांचं मंत्रालयाशी शत्रुत्व असावं अशापद्धतीने ते मंत्रालयात गेले नाहीत. त्याबद्दल शब्द नाही. नातवाला घेऊन कुठे कौटुंबिक जबाबदारी पार पाडली तर त्यावर टीका करायची हे राजकीय प्रथा परंपरेला शोभत नाही,” असा टोला त्यांनी एकनाथ खडसेंना लगावला आहे.
“महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा असणाऱ्या गडचिरोलीचा दौरा पहिलाच दौरा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आपला हा पहिलाच दौरा या नेत्यांनी पूर परिस्थितीची पाहाणी करण्यासाठी केला. त्यांनी तातडीने निर्णय घेतले, असे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.