सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांचा अर्धवटराव असा उल्लेख केला आहे. राज ठाकरे यांच्या भोंग्याविषयी वक्तव्यानंतर राज्यातले वातावरण चांगलेच पेटले आहे.
धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. धनंजय मुंडे म्हणाले, पूर्वी रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या (BJP) बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरु आहे.

अर्धवटराव आधी भाजपविरोधात खुप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी (ED) घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले, अशा शब्दात मुंडे यांनी राज ठाकरेंना जोरदार निशाणा साधला आहे. माणसं सत्तेत आली की कशी माजतात हे मागच्या पाच वर्षात आपण पाहिलं असे म्हणत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.
धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्याविषयीही भाष्य केले आहे. ते म्हणाले, जातीयवादी राजकारण करतो म्हणून सांगता. चार खासदार त्यांनी पाठवले. पवार साहेबांनी समतेचं राज्य उभं केलं.
भुजबळसाहेबांना, अमोल मिटकरींना, मला, अशी किती नावं आहेत, त्यांना मोठी पदं दिली. तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असेही धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष बनला. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्रीही होईल पण असा होणार नाही. जयंत पाटील साहेबांचं स्वप्न आहे की राष्ट्रवादीचे 100 आमदार निवडून आणायचे. हे स्वप्न नक्की पूर्ण होणार असेही मुंडे म्हणाले.