अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- राज्यात ज्यांच्या पक्षाचे सरकार असतांना ज्यांनी कधी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाचे प्रश्न सोडविले नाही. नांदूर मध्यमेश्वर कालव्याच्या वितरीकांसाठी जमीन संपादित केल्या त्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाही.
ज्यांचे नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या प्रश्नासाठी कोणत्याही प्रकारचे योगदान नसतांना त्यांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केविलवाणा असल्याची टीका भाजपाचे माजी तालुका सरचिटणीस राजेंद्र खिलारी यांनी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्यावर केली आहे.
नांदुर मध्यमेश्वर जलद कालवा खोपडी भूसंपादन मोबदल्याचा प्रस्ताव मार्गी अशा आशयाची बातमी माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीचा खुलासा करतांना भाजपाचे माजी तालुका सरचिटणीस राजेंद्र खिलारी यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना घरचा आहेर दिला आहे.
ते म्हणाले की, कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लौकी, धोत्रे, तळेगाव मळे, घोयेगाव, खोपडी व गोधेगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या वितरिका क्रमांक १ व २ साठी अनेक वर्षांपासून संपादित केल्या आहेत.
त्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी मागील पाच वर्षात ज्यांच्या पक्षाचे राज्यात सरकार होते त्यांच्याच पक्षाचे जलसंपदा मंत्री होते त्यांच्याकडून प्रयत्न होणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांकडे त्यावेळी सोयीस्करपणे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले.
परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तालुक्याच्या जनतेने अत्यंत विश्वासाने टाकलेली जबाबदारी पार पाडतांना आमदार आशुतोष काळे यांनी त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या प्रत्येक गावात जाऊन त्यांनी बाधित शेतकरी व प्रशासन यांच्या समवेत बैठका घेतल्या. संपादित केलेल्या जमिनीचा मोजणी संदर्भात शेतकऱ्यांच्या अपरोक्ष मोजणी केल्याचा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या.
त्याचबरोबर भु संपादन करतांना बागायती जमीन जिरायती दाखवण्यात आल्या होत्या. आदी तक्रारींचे निरसन करून त्या गट नंबर मधील सामावेश असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या क्षेत्रानुसार खातेफोड करून विस्तृत स्वरुपात अहवाल भूमी अभिलेख कार्यालयाने पाटबंधारे विभागाकडे सादर करावा.
ज्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या आपल्या बागायती जमीनी जिरायती दाखविल्याच्या तक्रारी आहेत त्या शेतकऱ्यांना तलाठ्यांनी योग्य मार्गदर्शन करून संबंधित तलाठी यांनी योग्य तो अहवाल तयार करून पाटबंधारे विभागाकडे तातडीने दाखल करावा.
ज्या गट नंबर बाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत ते गट नंबर पुन्हा मोजणी करून विभक्त करावे. महसूल,भूमीअभिलेख व पाटबंधारे विभागाने संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचे आदेश आ.आशुतोष काळे यांनी महसूल, भूमीअभिलेख व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.
एकही प्रकल्प बाधित शेतकरी जमिनीच्या मोबदल्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास त्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही अशी तंबी देखील आमदार आशुतोष काळे यांनी महसूल,
भूमीअभिलेख व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यावेळी दिली होती. आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत होऊन त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हि वास्तव परिस्थिती असून प्रत्येक बैठकीला मी स्वतः हजर असल्यामुळे मला सर्व परिस्थिती ज्ञात आहे. प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी एकमेव आमदार आशुतोष काळे यांचेच प्रयत्न व पाठपुरावा कामी आला असून खोपडी बरोबरच लौकी, धोत्रे, तळेगाव मळे,
घोयेगाव व गोधेगावच्या देखील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळणार आहे. मी जरी भाजप पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी पाणी प्रश्नाचा व माझा जवळचा संबंध असून हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेला पाठपुरावा मी जवळून पाहिलेला आहे.
त्यामुळे त्यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये असा सूचक सल्ला राजेंद्र खिलारी यांनी माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांना दिला आहे. माजी आ.सौ. स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांसमवेत बैठक घेवून वैजापूर वॉटर सप्लाय नांदूर मध्यमेश्वर कालव्याला जोडण्यासाठी देखील प्रयत्न केला होता.
जर वैजापूर वॉटर सप्लाय नांदूर मध्यमेश्वर कालव्याला जोडला असता तर पढेगाव शाखा बंद पडली असती व पर्यायाने पूर्व भाग उजाड झाला असता हे पूर्व भागाला परवडणारे नव्हते त्यामुळे माजी आ. कोल्हेंचा तो प्रयत्न देखील आमदार आशुतोष काळे यांनी हाणून पाडला असल्याचे राजेंद्र खिलारी यांनी म्हंटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम