रेशनच्या धान्याचा काळाबाजार; शेवगाव पुरवठा विभागाचा कारभार आला चव्हाट्यावर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे स्वस्त धान्य दुकानातील माल रिकाम्या बारदाण्याच्या वाहनातून काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले.

या घटनेची माहिती शेवगावच्या तहसीलदार यांना दिल्यानंतर प्रशासकी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दुकानातील धान्य साठ्याचा पंचनामा केला. यामुळे शेवगावच्या पुरवठा विभागातील गैरकारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील बालमटाकळी येथे स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे स्वस्त धान्य दुकान आहे. मंगरूळ येथील शिवाजी शंकर काकडे हे स्वस्त धान्य दुकान चालवीत आहेत.

धान्य वाटप सुरू असताना दुपारच्या सुमारास दुकानदाराने एक चारचाकी टेम्पो बोलावून त्यामध्ये रिकाम्या बारदाण्याचा भरणा केल्याचा बहाणा करून दुकानातील गहू तांदुळाचे 50 किलोचे पोते टेम्पोत टाकले.

टेम्पो हे धान्य घेऊन जात असताना ग्रामस्थांनी सिनेस्टाईलने रंगेहाथ पकडून सर्व प्रकारचा व्हिडीओ बनवला. सदरची माहिती ग्रामस्थांना समजताच दुकानासमोर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

याची माहिती तहसीलदारांना देण्यात आली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता स्वस्त धान्य दुकानात 50 किलोच्या 24 गोण्या आढळून आल्या.

सदर दुकानदारांनी पॉश मशीनचा वापर न करता धान्याचे वाटप केले जात असून व ग्राहकांना धान्य दिले तर रीतसर पावत्या दिल्या जात नाहीत असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान पॉश मशीन संबंधित अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये काय निष्पन्न होईल तसेच वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News