धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास पुस्तकांची भेट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास सामाजिक कार्यकर्ते दत्तू (राजू) रोकडे यांच्या वतीने पुस्तकांची भेट देण्यात आली. निंबळकचे माजी सरपंच स्व. विलासराव लामखडे यांच्या स्मरणार्थ ही भेट देण्यात आली.

निंबळक येथे झालेल्या कार्यक्रमात धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्याकडे पुस्तकांची भेट सुपुर्द करण्यात आली. यावेळी सहाय्यक पो.नि. युवराज आठरे, सरपंच प्रियंका लामखडे, युवा उद्योजक केतन लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, ग्रामपंचायत सदस्या मालन रोकडे, कोमल शिंदे,

सामाजिक कार्यकर्ते दत्तू (राजू) रोकडे, सौ. गायकवाड, माऊली रोकडे, सुनिल सकट, सचिन राठोड, मच्छिंद्र म्हस्के, दादा साठे, बाळू भापकर आदी उपस्थित होते. सरपंच प्रियंका लामखडे म्हणाल्या की, पुस्तकांनी माणुस घडतो, व्यक्ती म्हणून त्याचा विकास होतो.

युवा वर्ग मोबाईलमध्ये गुरफटल्याने वाचन संस्कृती लोप पावत आहे. मोबाईलमध्ये अनेक अ‍ॅप व गेम उपलब्ध झाल्याने नवीन पिढीने पुस्तकांकडे पाठ फिरवली आहे. ग्रामीण भागात वाचन संस्कृती पुन्हा बहरण्यासाठी धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

दत्तू (राजू) रोकडे यांनी सुसंस्कारीत समाज निर्मितीसाठी वाचन आवश्यक आहे. वाचन हा एक संवाद आहे. पुस्तकाचे वाचन केल्यास शब्दांच्या उच्चाराला धार येऊन उत्तम वक्तृत्व कौशल्य निर्माण होते. तर शब्दसंग्रह व ज्ञानात भर पडते.

पुस्तक हे एक मार्गदर्शक असून, अनेक महान व्यक्तीमत्व पुस्तक वाचनातून प्रेरणा घेऊन घडले. माजी सरपंच स्व. विलासराव लामखडे यांनी गावात स्पर्धा परीक्षा, पोलीस व लष्कर भरतीसाठी सराव करणार्‍या युवक-युवतींना पुस्तके उपलब्ध करुन दिली. त्यांची प्रेरणा घेऊन निमगाव वाघाच्या ग्रामीण भागातील वाचनालयास पुस्तक भेट देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe